कुरिअर कंपन्यांवर वचक कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:04 AM2021-07-20T04:04:26+5:302021-07-20T04:04:26+5:30

बापू सोळुंके औरंगाबाद : पंधरा दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी कुरिअरने मागविलेल्या ५९ तलवारी, कुकरींसह अन्य प्राणघातक शस्त्रे जप्त केली. या ...

Who cares about courier companies? | कुरिअर कंपन्यांवर वचक कुणाचा?

कुरिअर कंपन्यांवर वचक कुणाचा?

googlenewsNext

बापू सोळुंके

औरंगाबाद : पंधरा दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी कुरिअरने मागविलेल्या ५९ तलवारी, कुकरींसह अन्य प्राणघातक शस्त्रे जप्त केली. या प्रकरणात शस्त्रे मागविणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल झाला; मात्र शस्त्रांचे पार्सल पाठविणारी कुरिअर कंपनी अद्याप मोकाटच आहे. यामुळे घातक शस्त्रांची वाहतूक करणाऱ्या कुरिअर कंपन्यांवर वचक कोणाचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घातक शस्त्रे, नशा आणणारे गांजा, चरससह अन्य मादक पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी कुरिअर कंपन्यांना स्वीकारता येत नाही. असे असताना कुरिअर कंपन्या नियम धाब्यावर बसवून त्यांच्याकडे येणारे प्रत्येक पार्सल स्वीकारतात. त्यात काय आहे, याबाबत शहानिशा न करता ते संबंधित पत्यावर पोहोचतेही करतात. कुरिअर कंपन्यांवर कुणाचाच वचक नसल्याने सर्वकाही बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसून येते.

औरंगाबाद शहर पोलिसांनी ब्ल्यू डार्ट या कुरिअर कंपनीतर्फे शहरात आलेल्या तलवारी जप्त केल्या. तीन ते चार महिन्यांत ५८ प्राणघातक शस्त्रे कुरिअरमार्फत मागविण्यात आली. यासोबतच विविध शॉपिंग पोर्टलवरून खरेदी केलेल्या २७ तलवारी गुन्हे शाखेने चार वर्षांपूर्वी जप्त केल्या होत्या. विशेष म्हणजे या सर्व तलवारी वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांच्या स्थानिक कार्यालय आणि गोडाऊनवर छापा मारून जप्त केल्या होत्या. ऑनलाइन तलवारी खरेदी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हे नोंदविले होते. चार वर्षांपूर्वी झालेल्या कारवाईनंतरही कुरिअर कंपन्यांच्या कामकाजात काहीच बदल झाला नसल्याचे दिसून आले. कुरिअर कंपन्यांकडे शासकीय यंत्रणेचे फारसे लक्ष नसते. यातूनच त्या बिनधास्तपणे प्राणघातक शस्त्रे पाठविण्याचे धाडस करीत असल्याचे दिसून येते. अशा बेकायदेशीर घटना जोपर्यंत निदर्शनास येत नाहीत तोपर्यंत पोलिसांकडूनही कुरिअर कंपन्यांविरोधात कारवाई होत नाही.

चौकट...

कुरिअर कंपन्यांची जबाबदारी

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पार्सलमध्ये काय आहे, हे जाणून घेऊनच ते स्वीकारणे अपेक्षित असते. एवढेच नव्हेतर, कुरिअरचे पार्सल पाठविणाऱ्या आणि पार्सल स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा पत्ता अधिकृत आहे अथवा नाही, हे पाहण्याची जबाबदारीही कुरिअर कंपन्यांची असते. पार्सलवर बोगस पत्ता असेल तर संशयाला जागा असते. मात्र पार्सल पाठविण्याचे पैसे मिळतात हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कुरिअर कंपन्यांकडून डोळे झाकून पार्सल स्वीकारले जाते व पोहोचविलेही जाते.

चौकट

दुसऱ्याच वस्तूचे नाव टाकतात

स्थानिक कुरिअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनोद जाजू यांच्या मते आक्षेपार्ह वस्तूचे पार्सल कुरिअर कंपनीने पाठवू नये, असा नियम आहे. याचे पालन झाले नाही, तर काहीही होऊ शकते. जेव्हा पार्सल पाठविणारा इनव्हाईस (पार्सलमधील वस्तूंचे बिल) देतो, तेव्हा इनव्हाईसवर पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंची नावे असतात. व्यापाऱ्यांकडून अथवा कंपनीकडून ते पार्सल उघडून पाहिले जात नाही. बऱ्याचदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पार्सलमधील वस्तूची इतरांना माहिती होऊ नये, याकरिता ते इनव्हाईसवर (पार्सलचे बिल) दुसऱ्याच वस्तूचे नाव टाकतात. याच प्रकारातून तलवारी शहरात आल्याचे दिसून येते. यापूर्वीही असे प्रकार घडल्याचे जाजू यांनी सांगितले.

Web Title: Who cares about courier companies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.