यांना कोणी आवरा हो ! सोलापूर- धुळे हायवेवर बसथांब्याचे छत, केबलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 06:39 PM2022-01-19T18:39:37+5:302022-01-19T18:40:08+5:30
शासकीय मालमत्तेची नासाडीमुळे वैतागलेले अधिकारी आता पोलिसात दाद मागणार
औरंगाबाद : अज्ञात माथेफिरुंनी सोलापूर-धुळे हायवेवरील सुविधांच्या नासाडीचा सपाटा लावला आहे. या महामार्गावरील बसस्थांब्याचे छत, पथदिव्यांची भूमिगत केबल चोरीने अधिकारी वैतागले आहेत. या चोरट्यांना कुणी आवरा हो.. ! असे म्हणण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली असून ते अखेर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर ते गांधेली-सातारा दरम्यान स्मार्ट सिटीसारखरे बसथांब्यांचे शेड उभारण्यात आले आहेत. चोरट्यांनी त्या शेडचे छतच काढून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या महामार्गाच्या कडेला पावसाच्या सांडपाणी वाहून जाण्यासाठी साईड ड्रेनेज तयार केले असून त्यामध्ये दोन किलोमीटरपर्यंची टाकलेली केबल चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ओढून ती चोरून नेल्याचे निदर्शनात आले आहे.
विकासाला गालबोट लावणारा प्रकार!
दुभाजकांवर उगवलेल्या गवतावर जनावरे चरण्यासाठी सोडली जात असून त्याठिकाणी महामार्गाच्या सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेली फुलझाडांची नासाडीही जनावरांकडून होत आहे. या महामार्गामुळे परिसराचे वैभव वाढले असून, कानाकोपऱ्यांत असलेली गाव रस्त्यांलगत आल्याने विकास होणार आहे. मात्र, महामार्गावरील सुविधांच्या चोऱ्यांचे प्रकार वाढत चालल्यामुळे अभियंते व लगतच्या गावांतील नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.
गांधेली व बाळापूर-सातारा दरम्यान नुकसान
गांधेली बाळापूर, सातारा-देवळाई परिसरातील रस्त्यावर हा प्रकार वाढल्याने नागरिकांनी आपल्या परिसरातील वैभव जपण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठवाड्याच्या दृष्टीने हा रस्ता भूषणावह बाब असताना हे प्रकार थांबले जावेत. नाईलाजास्तव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्याच्या मनस्थितीत आहोत.
-अधिकारी भारत सिंग (राष्ट्रीय महामार्ग)