उड्डाणपुलांचे कारभारी आहेत तरी कोण ? दुरुस्तीसाठी यंत्रणांची टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:54 PM2022-01-05T17:54:05+5:302022-01-05T18:04:13+5:30
एमएसआरडीसीचे पत्र, मनपाचे हात वर, पीडब्ल्यूडीकडे एक पूल
औरंगाबाद : शहरातील जालना रोडवरील पुलांची देखभाल-दुरुस्ती करण्यावरून, महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी सुरू झाली आहे.
पुलांची देखभाल व दुरुस्ती कुणी करावी, यातून दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्या पुलांची दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाकडे शहरातील सेव्हन हिल पुलाचे हस्तांतरण करण्यात आले असून, पूल खराब झाल्याची ओरड सुरू झाल्यानंतरच ते जागे होतात. एमएसआरडीसी, मनपात पुलांच्या जबाबदारीवरून पत्रप्रपंचाच्या फैरी सुरू आहेत. बांधकाम विभागाकडे शहरातील फक्त एका पुलाची जबाबदारी आहे. ३ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुलांच्या जबाबदारीवरून मनपाने एका शब्दानेही उत्तर दिले नाही.
क्रांती चौक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट सुरू
‘लोकमत’ने ३ जानेवारीच्या अंकात क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर, ४ रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, मंगळवारी बांधकाम विभागाने ऑडिट सुरू केले.
एमएसआरडीसी म्हणे वर्षापूर्वीच दिले पत्र
एमएसआरडीसीने एक वर्षापूर्वीच मनपाला पत्र देऊन ४ पूल हस्तांतरित केल्याचे जाहीर केले. यात क्रांती चौक, मोंढा नाका, महावीर चौक, सिडको बस स्थानक या पुलांचा समावेश आहे. सेव्हन हिल्स पूल बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. अभियंता साळुंके यांनी सांगितले, मनपाकडे पूल हस्तांतरित केले आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
मनपा म्हणते, पत्र देऊन कुठे हस्तांतरण होते का?
मनपाचे शहर अभियंता एस.डी.पानझडे म्हणाले, रस्ते विकास महामंडळाने पूल बांधले आहेत. ते पत्राने हस्तांतरित कसे होतील? पुलाचे डिझाइन, मॅकेनिजम, बेअरिंग तंत्रज्ञान कसे आहे, इ. तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी दिली पाहिजे. एमएसआरडीसीने सगळ्या बाबी मांडल्या पाहिजेत.
कंत्राटदाराकडे किती दिवस जबाबदारी?
क्रांती चौक २०१७ पर्यंत, सेव्हन हिल्स २००७ पर्यंत, मोंढा नाका जून, २०२२, महावीर चौक मे, २०२३, सिडको उड्डाणपूल जून, २०२३ पर्यंत.