कोणाची उधारी ठेवत नाहीत! मग हे काय, ६ लाख वीजग्राहक एक रुपयाही देईनात,१५९० कोटी थकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:04 PM2022-04-27T16:04:16+5:302022-04-27T16:05:01+5:30
महावितरणाला आता जाग, तीन वर्षांपासून ६ लाख वीजग्राहकांनी एक रुपयाही बिल भरले नाही, तब्बल १५९० कोटी रुपयांची थकबाकी
औरंगाबाद : आपल्या डोक्यावर कोणाची एक रुपयाचीही उधारी राहू नये, असे अनेकजण म्हणतात. मात्र, मराठवाड्यात तब्बल ६ लाख वीज ग्राहक आहेत की, त्यांनी गेल्या ३ वर्षांपासून एकही रुपया महावितरणकडे भरलेला नाही. त्यांच्याकडे तब्बल १५९० कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीदार कोणीही असो, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त आदेश आता महावितरणने संबंधित यंत्रणेला दिले.
वीजबिल वसुलीसाठी सर्व वर्गवारीतील ग्राहकांपर्यंत पोहोचून पाठपुरावा करण्यासाठी महावितरणने हर घर दस्तक उपक्रम, एक गाव एक दिवस उपक्रम, एक वाॅर्ड एक दिवस उपक्रमासह मार्च महिन्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती केली. वसुलीसाठी ग्राहकांच्या घरोघरी बिल भरल्याची पडताळणी करून बिले भरून घेणे, सतत पाठपुरावा करणे, वीजबिल दुरुस्ती व बिले भरण्यासाठी मेळावे घेणे, प्रचार, प्रसिद्धी व विविध माध्यमातून जनजागृती करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. तरीही मराठवाड्यात गेल्या ३ वर्षांपासून सर्व वर्गवारीतील ६ लाख ४७ हजार ६२२ वीज ग्राहकांनी एकही रुपया न भरल्याने १५९० कोटी ५५ लाख ३२ हजार रुपये थकविले आहेत.
...तर टळेल भारनियमन
ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा केल्यास व संबंधित फिडरवर वीज चोरी कमी केल्यास फिडर भारनियमनाच्या वरच्या गटात येऊन भारनियमन टळेल. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
मराठवाड्यातील थकबाकीची स्थिती
परिमंडळ - ग्राहक - थकबाकी (कोटी)
औरंगाबाद - २,३२,७५४ - ५३४८३.७३
लातूर - २,३३,०७३ - ५५२५६.४६
नांदेड - १,८१,७९५ - ५०३१५.१४