मनोज जरांगे यांच्या विरोधात निवेदन देणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 04:14 PM2024-06-24T16:14:15+5:302024-06-24T16:19:51+5:30
आधी शाल, फुलांचा गुच्छ देत स्वागत करत चार ते पाच जणांनी डॉ. तारख यांना पकडून ठेवत तोंडाला काळे फासले.
छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्याच्या रागातून डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळे फासले. आधी शाल, फुलांचा गुच्छ देत स्वागत करत चार ते पाच जणांनी डॉ. तारख यांना पकडून ठेवत तोंडाला काळे फासले. जरांगे यांना विरोध का करता असा जाब देखील आंदोलकांनी केला. दरम्यान हे आंदोलक झुंजार छावा संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.
डॉ. रमेश तारख हे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांचे जुने सहकारी असल्याची माहिती आहे. सुरुवातीच्या काळात जरांगे यांच्यासोबत सक्रिय असलेले डॉ. तारख मागील एक महिन्यापासून मराठा आंदोलनापासून दुरावले. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन अंतरवाली सराटी येथील काहींनी जालना जिल्हाधिकारी यांना दिले होते. यात डॉ. रमेश तारख हे देखील होते. निवेदन देऊन जातीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आंदोलक त्यांच्यावर मराठा संतप्त होते.
मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे यांच्या विरोधात निवेदन देणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले #marathareservation#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/IrGe65itx5
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) June 24, 2024
दरम्यान, आज दुपारी काही आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांना फोन करून एका पेशंटला दाखविण्यासाठी येत असल्याचे सांगितले. रुग्णालयात पेशंट तपासात असताना चार ते पाच आंदोलक डॉ. तारख यांच्या कॅबिनमध्ये शिरले. तुमचा वाढदिवस आहे, म्हणत शाल, पुष्पगुच्छ देत त्यांना घेराव घातला. डॉ. तारख यांनी वाढदिवस आंसल्याचे सांगत असतानाच एकाने कॅबिनचा दरवाजा बंद केला. तर दोघांनी त्यांना पकडून ठेवले. बाकीच्या आंदोलकांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले. जातीच्या विरोधात का जातो, उपोषणास परवानगी देऊ नका म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन का दिले , असा जाब आंदोलकांनी डॉ. तारख यांना केला. त्यानंतर आंदोलक तेथून निघून गेले.
ही झुंडशाही आहे
अंतरवाली सराटी ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे, हे मी सांगितले. ही झुंडशाही आहे, हे चुकीचे आहे.
समाजासाठी मी माझ काम सुरूच आहे, अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर डॉ. रमेश तारख यांनी दिली.