मनपाने वसूल केलेला कर जातोय कुणीकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:02 AM2021-08-14T04:02:12+5:302021-08-14T04:02:12+5:30
औरंगाबाद : नगरसेवकपद गेल्यानंतर सातारा- देवळाईत मनपाने कोणतेही नवीन काम सुरू केले नाही. राज्य शासनाकडून मंजूर कामेच सुरू आहेत. ...
औरंगाबाद : नगरसेवकपद गेल्यानंतर सातारा- देवळाईत मनपाने कोणतेही नवीन काम सुरू केले नाही. राज्य शासनाकडून मंजूर कामेच सुरू आहेत. मग वसूल केलेला कर जातोय कुणीकडे, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
सातारा- देवळाईचा विकास व्हावा म्हणून परिसर मनपात विलीन करण्यात आला होता. त्यानुसार काहीही निर्णयात्मक काम झालेली नसल्याने निराशा झालेली आहे. दोन्ही वॉर्डांतील विविध कॉलन्यांतील नागरिकांना मूलभूत सेवासुविधादेखील मनपाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शासनाने मंजूर केलेल्या योजनेतूनच रस्ते, पाणी, तसेच ड्रेनेजलाइनचे काम हाती घेतले आहे. कराच्या रूपाने सिडकोकडील साडेआठ कोटींच्या निधीतून मोजकेच रस्ते तयार करण्यात आले. त्यानंतर मनपाने कोणतेच विकासकाम हाती घेतले नाही.
मनपाला कार्यालयासाठी जागा सापडेना...
मनपा आयुक्तांनी सातारा- देवळाई वॉर्ड कार्यालयास भेट दिली. त्यावेळी रोडवर कार्यालयासाठी जागा शोधण्यास परवानगी दिली आहे. जागेचा शोध सुरू आहे; परंतु अद्याप प्रशस्त जागा मिळालेली नाही. ही शोकांतिका असून, वॉर्डातील विकासकामे कधी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
मग कामे कधी?
जी कामे सुरू आहेत, ती राज्य शासनाच्या निधीतून असून, परिसरातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मनपावर प्रशासकीय कारभार आहे; परंतु स्मार्ट सिटीत सातारा- देवळाई परिसर दुर्लक्षित ठेवलेला आहे.
-सायली जमादार (माजी नगरसेविका)
साधे उद्यानही फुलविले नाही
सातारा- देवळाई परिसरात बालकांसाठी उद्यान विकसित करण्यासाठी मनपाने संग्रामनगरलगत मोकळ्या जागेची निवड केली होती, तेथे साधे एक झाडदेखील लावण्यात आलेले नाही. विकासकामे करणार कधी.
-प्रा. भारती भांडेकर
स्वत:चा निधी वापरणार कधी?
सातारा- देवळाई परिसरात मनपा आहे की नाही, असाच प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. कचरा सफाई वगळता विकासकामात कोणताही सहभाग मनपाने घेतलेला नाही. कराच्या रूपाने जमा होणारा पैसा सातारा- देवळाईत का वापरत नाहीत, असा सवाल रमेश बाहुले, सोमीनाथ सिराणे, जमील पटेल, नामदेव बाजड आदींनी उपस्थित केला आहे.