अब्दुल सत्तारांविरोधात कोण? राजकीय आखाड्यात अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:34 AM2024-10-16T11:34:45+5:302024-10-16T11:36:46+5:30
गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विरोधक कोणाला रिंगणात उतरविणार याची तालुक्यातील जनतेमध्ये उत्सुकता लागली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघावर अब्दुल सत्तार यांचे प्राबल्य आहे. २००९ व २०१४ मध्ये अब्दुल सत्तार काँग्रेसच्या तिकिटावर, तर २०१९ मध्ये शिवसेनेकडून असे तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर, २००९ व २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार सुरेश बनकर यांचा पराभव केला होता.
अब्दुल सत्तार ज्या पक्षात जातात त्या पक्षात त्यांचे कार्यकर्ते जातात. यामुळे या मतदारसंघात पक्षाला महत्त्व नाही केवळ सत्तार समर्थक व सत्तार विरोधक असा हा मतदारसंघ आहे. आघाडीतील वरिष्ठ नेते भाजपमधून उमेदवार आयात करून अब्दुल सत्तार यांना मात देण्याचे चक्रव्यूह रचत आहेत, तर आघाडीकडून तिकीट कुणाला सुटते सेना, काँग्रेस की राष्ट्रवादी यावर सर्वकाही अवलंबून आहे.
अनेक पहिलवान लंगोट बांधून तयार
या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांना मात देण्यासाठी भाजप कडून सुरेश बनकर, सुनील मिरकर, ठगन भागवत, काँग्रेसकडून भास्कर घायवट, कैसर आझाद, बनेखाॅ पठाण, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून रंगनाथ काळे, शेख शफिक, राहुल ताठे, शेख शाकेर, भाकपकडून सय्यद अनिस, एमआयएमकडून मुख्तार ऊर्फ बबलू, फईम पठाणसह २० आणखी उमेदवार लंगोट बांधून तयार आहेत.
बनकर उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
सिल्लोडची जागा युतीमध्ये शिंदेसेनेकडे जाणार हे निश्चित असून, यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत भाजपचे सुरेश बनकर हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा मतदारसंघात असून, ते शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून रिंगणात उतरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.