रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:52 IST2025-01-02T15:52:33+5:302025-01-02T15:52:59+5:30

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे.

Who is responsible for the technical error in the road and water pipeline work? Joint inspection of the administration on January 3 | रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी

रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना आणि पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या कामातील तांत्रिक दोष तपासून त्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवार, दि. ३ जानेवारीला प्रशासनाकडून संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी तज्ज्ञ समितीच्या संयुक्त बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर ते पैठण या महामार्गावर मुख्य जलवाहिनी टाकताना काही भागांत रस्त्याखाली जलवाहिनी आणि त्यावर नवीन रस्त्याचे काम करण्यात आले आहे. शिवाय इतरही काही अडथळे आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात तज्ज्ञ समितीची बैठक पार पडली. बैठकीला विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, जलवाहिनीच्या कामात काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता आणि जलवाहिनी यांचे ओव्हरलॅपिंग झालेले आहे. या सर्व गोष्टींची पाहणी करून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय समितीकडून शुक्रवारी सकाळी पाहणी केली जाईल. पाहणीनंतर आवश्यक त्या उपाययोजना करून पाणी योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तांत्रिक चूक कोणाची आहे, याकडे लक्ष देण्याऐवजी या सगळ्या गोष्टींवर उपाययोजना काय करावी, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे समितीने पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

गरज पडल्यास भूसंपादन
दोन्ही योजनांत तांत्रिक अडथळा येत असेल आणि तिथे जागा संपादन करून रस्ता बांधकाम करण्याची वेळ येत असेल तर अशा ठिकाणी भूसंपादन करण्याचा प्रयत्नदेखील होईल. यासाठी जो काही खर्च लागेल तो खर्चसुद्धा करण्याची तयारी प्रशासन ठेवून आहे. २७४० कोटींच्या योजनेमध्ये पाच, दहा कोटी रुपये भूसंपादनास लागले तरी प्रशासन त्यावरदेखील सकारात्मक विचार करणार आहे.
- जी. श्रीकांत, मनपा प्रशासक

Web Title: Who is responsible for the technical error in the road and water pipeline work? Joint inspection of the administration on January 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.