औरंगाबादेत महायुतीच्या उमेदवाराची उत्सुकता शिगेला; भुमरेंसह विनोद पाटील यांनी घेतले अर्ज
By विकास राऊत | Published: April 20, 2024 11:16 AM2024-04-20T11:16:42+5:302024-04-20T11:19:52+5:30
नाशिकसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला. मात्र औरंगाबादचा कायम आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मंत्री संदीपान भुमरे यांना मुख्यमंत्र्यांनी लढण्याचा ‘कानमंत्र’ दिल्याचे सांगितले जाते, परंतु त्यांच्या नावाची घोषणा का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्यासह विनोद पाटील आदींनी उमेदवारी अर्ज विकत घेतले.
नाशिकसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला. मात्र औरंगाबादचा कायम आहे. ही जागा शिंदेसेना लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, पण उमेदवार कोण? हा प्रश्न कायम आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी अपेक्षित होती. गेल्या दोन दिवसापासून भुमरे मुंबईत तळ ठोकून आहेत. भुमरे यांचे नाव पुढे आल्याने स्थानिक भाजपा नेत्यांनी देखील जागेसाठी असलेला आग्रह सोडून दिला आहे.
यांचे अर्ज दाखल....
बहुजन महापार्टीकडून मंदा खरात, सुरेश फुलारे, खान एजाज महेमूद मो. बिस्मिल्लाह खान, खाजा असिम शेख यांनी अपक्ष, तर हिंदुस्तान जनता पार्टीतर्फे बबनगीर गोसावी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पदाधिकाऱ्यांचे लाॅबिंग...
भाजपातील काही जणांनी विनोद पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी लॉबिंग केले. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. परंतु त्यांच्या लॉबिंगला वरिष्ठांकडून काहीही दाद मिळाली नाही. उलट पक्षशिस्तीचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण लोकसभा निवडणुका होईपर्यंत यावर काहीही निर्णय घ्यायचा नाही, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.