विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण? आज नाव जाहीर होण्याची शक्यता
By विजय सरवदे | Published: January 17, 2024 05:21 PM2024-01-17T17:21:35+5:302024-01-17T17:22:07+5:30
अद्याप कुलगुरूपदाच्या निवडीत कोणी बाजी मारली, याबद्दल ‘सस्पेन्स’ राखला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूपदाची सूत्रे बुधवारी सायंकाळपर्यंत घेण्याचे राज्यपाल कार्यालयाचे आदेश असले, तरी अजूनही कुलगुरूपदी कोण विराजमान होणार, याचे नाव पुढे आलेले नाही. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात आणि डॉ. संजय ढोले या तिघांपैकी कुलगुरूपदासाठी कोणाची वर्णी लागेल, याबद्दल जोरदार खलबते सुरू आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपुष्टात आला. त्यानंतर ४ जानेवारी रोजी राज्यपाल कार्यालयाने नवीन कुलगुरूपदासाठी ‘टॉप फाइव्ह’ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींसाठी तेरा दिवसांचा कालावधी होत आला तरी अद्याप कुलगुरूपदाच्या निवडीत कोणी बाजी मारली, याबद्दल ‘सस्पेन्स’ राखला जात आहे.
विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने २८ नोव्हेंबर २०२३ रोजी २४ जणांना मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी ‘टॉप फाइव्ह’ नावाची यादी बंद लिफाफ्यात राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती. त्यात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी, डॉ. ज्योती जाधव, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढोले आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता. या पाच जणांना १९ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतींसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, एकदिवस अगोदर सदरील मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याच्या सूचना मिळाल्याने त्यांच्या मुलाखती ४ जानेवारी रोजी झाल्या. त्याच दिवशी सायंकाळी नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, त्याबाबत अद्यापही सस्पेन्स राखण्यात आला आहे.
राष्ट्रवादी बाजी मारणार का?
कोल्हापूरचे डॉ. विजय फुलारी यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट प्रयत्नशील आहे, तर भाजप प्रणीत पुण्यातील विद्यापीठ विकास मंचने डॉ. संजय ढोले यांच्या नावासाठी आग्रह धरल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता कोणती राजकीय विचारसरणी यात बाजी मारेल, याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.