मराठवाड्यात शिक्षकांचा आमदार काेण? पुन्हा विक्रम काळे की होणार बदल, मतमोजणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:04 PM2023-02-02T12:04:36+5:302023-02-02T12:05:22+5:30
१४ उमेदवारांमुळे बहुरंगी लढत, ३०० मतपेट्यांत ५३ हजार २५७ मतदारांचा कौल
औरंगाबाद : शिक्षकांचा आमदार कोण होणार, याचा फैसला आज होणार आहे. आठ जिल्ह्यातील ५३ हजार २५७ शिक्षकांनी नेता निवडीसाठी मतदान केले असून, १४ उमेदवारांमुळे बहुरंगी झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिकलठाण्यातील कलाग्रामसमोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. या कंपनीच्या शेड्समध्ये सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.
मतमोजणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बुधवारी (दि.१) मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण शिबीर झाले. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युतपुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था, तसेच आवश्यक त्या कक्षांची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आढावा घेतला.
अशी होणार मतमोजणी.....
५६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरुवातीला सर्व मतपेटीतील मते एका हौदात टाकण्यात येतील. त्यानंतर, सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा, याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मतांप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर मतांच्या फेऱ्या सुरू होतील. या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी वर्तविली.
उमेदवारांमध्ये धाकधूक.....
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह मराठवाडा शिक्षक संघ व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी सर्वांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.विक्रम काळे, भाजपकडून प्रा.किरण पाटील, वं.ब.आघाडीकडून कालिदास माने, तर मराठवाडा शिक्षक संघाकडून सूर्यकांत विश्वासराव, अपक्ष प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचवरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे यांनी निवडणूक लढविली. यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे.