प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 11:40 AM2021-10-13T11:40:57+5:302021-10-13T11:46:34+5:30

खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे.

Who is the killer of Prof. Rajan Shinde? Non-cooperation of police in interrogation of family members | प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य

googlenewsNext
ठळक मुद्देएन-२ सिडको भागात डॉ. शिंदे यांचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली

औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन शिंदे यांच्या निर्घृण खुनाचे गूढ मंगळवारीही कायम राहिले. पोलीस पथकांना घटनेच्या ३६ तासांनंतरही कोणताही सुगावा लागला नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांची सखोल चौकशी केली. चौकशीत कुटुंबातील सदस्यांनी सहकार्य केले नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

एन-२ सिडको भागात डॉ. शिंदे यांचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे पथक नेमले. या पथकाने मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच चौकशीसाठी कुटुंबातील एका सदस्याला ताब्यात घेतले. त्याची तब्बल दहा तास चौकशी करून घरी सोडले. पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नाचे समर्पक उत्तर या सदस्याने दिले नाही. पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने डॉ. शिंदे यांची पत्नी, बहीण व मुलीचीही कसून चौकशी केली. त्यांच्या माहितीत विसंगती आढळली. डॉ. शिंदे यांनी रविवारी घरी येण्यापूर्वी पडेगावातील एका हॉटेलवर जेवण केले. त्यांच्यासोबत आणखी दोन प्राध्यापक होते. या प्राध्यापकांसह हॉटेल मालकाचीही चौकशी करण्यात आली. त्या हॉटेलवरून डॉ. शिंदे हे मित्राला सोडण्यासाठी विद्यापीठात गेले. तेथून घरी आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले. उपायुक्त दीपक गिऱ्हे, निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सुनील चव्हाण यांच्यासह मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी आदींनी ही चौकशी केली.

नेटफिलिक्सवर सिरीज पाहिल्या
पोलिसांच्या चौकशीत डॉ. राजन हे घरी आल्यानंतर त्यांचे पाय दुखत असल्यामुळे रात्री दीड वाजेपर्यंत चेपले, त्यांच्या जवळच अडीच वाजेपर्यंत जागे होतो, असे त्यांच्या मुलाने सांगितले. रात्री १ वाजताच सर्व जण झोपी गेल्याचे पत्नीने सांगितले. एका सदस्याच्या नेट सर्चिंगमध्ये वेगवेगळ्या किलर सिरीज सर्च करणे, पाहणे, त्याविषयी काही टिपण काढल्याच्याही नोंदी सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांना या प्रश्नांचे उत्तर मिळेना
१) डॉ. शिंदे हे रविवारी रात्री ११.३० वाजता घरी आल्याचे त्यांच्या घरापासून तिसऱ्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पहाटे ५.३० वाजता मुलगा घराबाहेर पडल्याचे, काही वेळाने ॲम्ब्युलन्स घरी आल्याचे सीसीटीव्हीत दिसते. त्याशिवाय कोणी बाहेरील व्यक्ती घरात गेला असता तर तोही कॅमेऱ्यात कैद झाला असता. मग, खून घरातीलच एखाद्या सदस्याने केला काय?
२) मुलाने वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना घरातील आई, बहीण, आजी-आजोबांना न सांगता थेट दवाखाना कशासाठी गाठला, त्याने कुटुंबीयांना माहिती का दिली नाही?
३) ॲम्ब्युलन्स दारात आल्यानंतर चालक हे प्रकरण पोलिसात कळविण्याची सूचना देऊन निघून गेला. त्यानंतर मुलाने बहिणीला उठवून पोलीस चौकीत सोबत नेले; पण आईला उठवले का नाही?
४) मुलीनेही वडिलांचा मृतदेह पाहून थेट भावासोबत जाणे योग्य मानले. घरातील व्यक्तींना खुनाबद्दल काहीही सांगितले नाही. तोपर्यंत आईसुद्धा झोपेतच होती. आईच्या परस्पर मुलांनी दवाखाना, पोलीस चौकी का गाठली?

पत्नीची विद्यापीठाकडे बदलीची मागणी
डॉ. शिंदे यांच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी मुलीसह विद्यापीठाचे कुलगुरु, कुलसचिवांची मंगळवारी सकाळी भेट घेतली. उस्मानाबाद उपकेंद्रातून विद्यापीठात बदली करण्याची मागणी त्यांनी कुलगुरुंकडे केली. या भेटीनंतर गुन्हे शाखेच्या पथकानेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. बदलीच्या मागणीवरूनही पोलीस चक्रावून गेले आहेत.

इतर खुनांची पुनरावृत्ती तर नाही?
शहरात श्रुती भागवत, अमीना बी, हवाला प्रकारातून प्रकाशभाई पटेल यांची हत्या झाली होती. याशिवाय उद्योगपती पारस छाजेड यांच्यावर घरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. या घटनांना वर्षे उलटून गेली आहेत. सबळ पुरावा हाती न लागल्यामुळे तसेच काही प्रकरणांमध्ये कुटुंबीयांच्या सदस्यांकडून बचाव व बनाव केला गेला आहे. त्यामुळे भूतकाळातील या खून आणि प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागू शकलेला नाही. डॉ. शिंदे यांच्या हत्येबाबतही असेच चित्र मंगळवारपर्यंत तरी पहायला मिळाले.

Web Title: Who is the killer of Prof. Rajan Shinde? Non-cooperation of police in interrogation of family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.