औरंगाबादमधील 'त्या' सहा जणांचे मारेकरी कोण ? खबरे तुटले, खुनांचा तपास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:43 PM2018-01-29T13:43:55+5:302018-01-29T13:44:53+5:30
खबरे हे पोलिसांचे कान आणि डोळे असल्याचे म्हटले जाते. मात्र, अलीकडच्या काळात पोलीस अधिकारी केवळ नोकरी करायची म्हणून करीत असल्याने खबर्यांची साखळी तुटून पडली. त्याचा परिणाम खुनाच्या घटनांच्या तपासावर झाल्याचे दिसून येते. आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या सहा गुन्ह्यांच्या तपासाच्या फाईल पोलिसांनी बंद केल्या आहेत.
औरंगाबाद : खबरे हे पोलिसांचे कान आणि डोळे असल्याचे म्हटले जाते. मात्र, अलीकडच्या काळात पोलीस अधिकारी केवळ नोकरी करायची म्हणून करीत असल्याने खबर्यांची साखळी तुटून पडली. त्याचा परिणाम खुनाच्या घटनांच्या तपासावर झाल्याचे दिसून येते. आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या सहा गुन्ह्यांच्या तपासाच्या फाईल पोलिसांनी बंद केल्या आहेत.
शेळीपालन करणारी अमिनाबी
माळीवाडा येथे राहणार्या अमिनाबी पठाण यांचा खून होऊन चार वर्षे होत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांसह छावणी पोलिसांनी केलेल्या तपासात गायकवाड नावाचा एक तरुण या हत्येमागे असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले. घटनेपासून तो पसार आहे. काही दिवसांपूर्वी तो वैजापूर येथील एका उसाच्या फडात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेचे पोलीस तेथे पोहोचण्याआधी वैजापूर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र, वैजापूर पोलिसांनाही चकमा देऊन तो तेथून पसार झाला होता. आठ महिन्यांपासून त्याचा कोणताही सुगावा लागला नाही.
अनोळखी महिलेचा खून...
दौलताबादच्या जंगलात सहा महिन्यांपूर्वी एका अज्ञात महिलेचा खून करून फेकलेले प्रेत पोलिसांना सापडले होते. प्रेत सापडले तेव्हा ते कुजलेल्या अवस्थेत होते. परिणामी आजपर्यंत पोलिसांना मृत महिलेची ओळख पटविता आली नाही. आधार कार्डवरून तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. कुजलेल्या प्रेताचे ठसे आधारलिंकशी जुळले नाही. मोपेडस्वाराने त्या महिलेला तेथे आणले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर मात्र तपास थांबला तो आजपर्यंत.
धनई यांच्या खुनाला सहा महिने पूर्ण
दिनकर धनई ( रा. शिवशाहीनगर) यांचा खून करून प्रेत जुना मोंढा परिसरातील काळीबावडीजवळ २९ जुलै रोजी पोत्यात आढळले होते. दुकानमालकाचे १५ हजार रुपये घेऊन ते मोपेडने बँकेत गेले होते. तेव्हापासून ते गायब झाले होते. तीन दिवसांनंतर खुनाची घटना समोर आली. जिन्सी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. तपासात मृताची मोपेड रेल्वेस्टेशन रोडवर सापडली होती. तेथून पुढे तपास सरकलाच नाही.
आरोपी अटकेत मात्र...
हॉटेल आणि प्लॉटिंग व्यावसायिक हुसेन खान अलियार खान ऊर्फ शेर खान (५५, रा. पेन्शनपुरा, छावणी) यांचा २७ डिसेंबरच्या रात्री छावणी परिसरात खून करण्यात आला. या घटनेप्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. मात्र, त्यांनी खून कसा केला, याबाबतची माहिती मात्र पोलिसांना दिली नाही. यामुळे हा खून अटकेतील आरोपींनीच केला अथवा अन्य कोणी हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही.
श्रुती भागवत खून प्रकरण
१९ एप्रिल २०१२ रोजी पहाटे शिक्षिका श्रुती भागवत यांची हत्या अज्ञातांनी केली. जवाहरनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह राजेंद्र सिंह नंतर अमितेश कुमार या पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात एसआयटी स्थापन करून तपास केला, तेव्हा दौलताबाद येथील एका मृत संशयितापर्यंत पोलीस पोहोचले आणि तेथून तपास पुढे गेलाच नाही.
अंकुश खाडे खून प्रकरण...
बाळापूर येथील दूध विक्रेता अंकुश खाडे यांची गोळी झाडून अज्ञातांनी हत्या केली. बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्समागील मोकळ्या जागेवर त्याचे प्रेत सापडले होते. या घटनेला आज चार ते साडेचार वर्षे झाले. या खुनाचा तपास करीत असताना गुन्हे शाखा पोलीस शिवाजीनगर येथील एका महिलेपर्यंत गेले होते. मात्र, तिचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे समजले. नंतर आरोपी सापडत नाही, असा शेरा मारून तपास बंद केला.