महाराष्ट्रातील उद्योग लुटून गुजरातला कोणी नेले? उद्धव ठाकरे यांचा तिखट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:33 AM2024-11-15T11:33:33+5:302024-11-15T11:34:10+5:30
छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केले, श्रेय ते घेताहेत: उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : ‘तुम्हाला मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो, म्हणून तुम्ही मला संपवायला निघाला आहात. माझी माणसं गद्दारी करून फोडली, महाराष्ट्रातील अनेक उद्योग लुटून गुजरातला कोणी नेले? ‘महाराष्ट्र लुटेंगे और दोस्तों को बाँटेंगे’ हीच खरी त्यांची नीती आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी रात्री ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी मंचावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अशोक पटवर्धन, अनिल पटेल, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, मध्य मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब थोरात, पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे, पैठणचे उमेदवार दत्ता गोर्डे, कन्नडचे उमेदवार उदयसिंग राजपूत, फुलंब्रीचे उमेदवार विलास औताडे, वैजापूरचे उमेदवार दिनेश परदेशी, पूर्वचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहू शेवाळे आणि गंगापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले की, कोविडकाळात शेवटच्या कॅबिनेटमध्ये आपण शहराचे नामकरण संभाजीनगर केले. मात्र मोदी याचे श्रेय मिंधेंना देत आहेत. असे असेल तर मग या लोकसभा मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे? शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे? असा सवाल त्यांनी केला. मोदी हे देशाचा कारभार सोडून महाराष्ट्र जिंकण्यासाठी पंतप्रधान म्हणून नव्हे तर भाजपचा स्टार प्रचारक म्हणून सभा घेत आहेत, यामुळे त्यांचीसुद्धा बॅग निवडणूक आयोगाने तपासली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
मुलांना मोफत शिक्षण देणार
मागील दौऱ्यात एका शेतकरी महिलेने लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये मिळाल्याचे सांगताना मुलाच्या शाळेच्या फीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हा माझ्या तालुकाप्रमुखाने त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. ही परिस्थिती राज्यभर आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मुलांना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. सध्या सोयाबीन आणि कापसाला अत्यल्प भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नका, आपले सरकार आल्यावर सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देणार असल्याचे ठाकरे म्हणाले.