या बेवारस वाहनांचा मालक कोण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:06 AM2021-03-07T04:06:06+5:302021-03-07T04:06:06+5:30
औरंगाबाद : पार्किंग, घरासमोरून अथवा रस्त्यावरून वाहने पळविण्याचे प्रकार वाढले असून, चोरट्यांनी पळविलेल्या वाहनांतील पेट्रोल संपले की, गाडी रस्त्यात ...
औरंगाबाद : पार्किंग, घरासमोरून अथवा रस्त्यावरून वाहने पळविण्याचे प्रकार वाढले असून, चोरट्यांनी पळविलेल्या वाहनांतील पेट्रोल संपले की, गाडी रस्त्यात सोडून चोरटे पसार होतात. नागरिकांनी खबर दिल्यास पोलीस वाहन जप्त करून ते ठाण्याच्या आवारात जमा केले जाते. ही वाहने अनेक महिने पडून राहतात. त्यामुळे परिसरात अडचण होते. पोलीस ठाण्यात पाठपुरावा करणाऱ्यांना गाडी सापडतेही. त्यावेळी तो आनंदित होऊन ती कोर्टाकडून रीतसरपणे सोडवून नेतो; परंतु ही वाहने कित्येक महिने पोलीस ठाण्याच्या आवारात किंवा पोलीस आयुक्तालयात पडून राहतात. ज्या वाहनाचा कुणी मालक आलाच नाही, तर अशी वाहने रोलर चालवून ती भंगारात विकली जातात.
शहरात वाहनचोरीच्या घटना वाढल्या असून, सामान्य नागरिकांना स्वत:चे वाहन चोरी झाल्यावर अत्यंत कष्टी मनाने त्याचा शोध घ्यावा लागतो. वाहन चोरट्याच्या टोळ्यादेखील पोलीस पकडतात, त्यांच्या ताब्यातून वाहने जप्त केली जातात. अशा प्रसंगी ज्यांची वाहने आहेत, त्यांना ती रीतसरपणे कागदपत्रांची पूर्तता करून स्वाधीन केली जातात.
अपघात किंवा मुद्देमालात जप्त वाहनेदेखील पोलीस ठाण्याच्या आवारात पडलेली असतात. अनेक जण आपली वाहने कायदेशीररीत्या सोडवूनदेखील नेतात; अन्यथा वर्षअखेर कुणीच मालक आला नाही, तर ही वाहने निकाली काढण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलीस प्रशासन करते. ती विक्री काढली जातात किंवा क्रॅश करून भंगारात विक्री केली जातात.
नागरिकांच्या प्रतिक्रिया...
वाहन चोरीला गेले की, व्यक्ती कासावीस होते, वाहन हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली जाते; परंतु ते सापडले, तर सामान्य व्यक्तीच्या आनंदात भर पडते. अशा वेळी सातत्याने पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून गाडीची विचारणा करावी लागते.
-रवी शर्मा (नागरिक)
घरासमोरून अचानक गाडी गेली, हे लक्षात येते. ती नेमकी नेली कुणी, असा प्रश्न पडतो. कागदपत्रे दाखवून पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करण्याशिवाय पर्याय नसतो. कर्जावर घेतलेल्या गाडीची मासिक रक्कम बँकेत भरावी लागते. हा एक प्रकारे मनस्तापच होय.
-नीलेश पवार (नागरिक)
सापडलेली गाडी सोडविण्यासाठी नागरिकांना न्यायालयात चकरा माराव्यात लागतात. पोलीस प्रशासनदेखील त्यासाठी सहकार्य करते. मग ती गाडी अपघातातील असो की, चोरी गेलेली व परत मिळालेली. अशा प्रसंगी कागदपत्रांची पूर्तता महत्त्वाची ठरते.
-भगवान गायकवाड (नागरिक)
पोलीस अधिकारी काय म्हणतात...
पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस वाहनमालकांची अनेकदा आरटीओ ॲपवरून ओळख पटविली जाते. त्यानुसार त्या व्यक्तीशी संबंधित पोलीस ठाण्यातून संपर्क साधला जातो. वाहन चोरट्याकडून जप्त केलेल्या वाहनावर बनावट नंबर असतो, अशा वेळी अडचणी येतात. वर्षअखेर झोननुसार वाहनांचा निपटारा केला जातो. वाहनाचा कोणी मालक आलाच नाही, तर ती वाहने निकाली काढण्याची प्रक्रिया राबविली जाते. ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येते. कायदेशीरपणे कागदपत्रांची पूर्तता केलेल्या व्यक्तीकडे वाहन सोपविले जाते.
-पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे (एमआयडीसी सिडको)
कॅप्शन...
१) एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यामध्ये भंगार झालेली वाहने.