रुळावर कोणी ठेवले सिमेंटचे ढापे, दगड? ‘सीसीटीव्हीं’ची तपासणी, रात्रीची गस्त सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 07:33 PM2024-09-25T19:33:08+5:302024-09-25T19:33:39+5:30
आरोपीचा शोध सुरू : स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाकडूनही तपास
छत्रपती संभाजीनगर : लाडगाव-करमाड शिवारात रेल्वे रुळावर सिमेंटचे ढापे, दगड ठेवणाऱ्यांचा स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाकडून शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असून, रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे रुळावर रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे.
रेल्वे रुळावर ठेवलेले सिमेंटचे ढापे, दगडांमुळे नंदीग्राम एक्स्प्रेसचा सुदैवाने मोठा अपघात टळल्याची घटना रविवारी मध्यरात्री १ वाजता लाडगाव - करमाड शिवारात घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. तर रेल्वे सुरक्षा बलानेही चौकशी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक नेमले आहे. स्थानिक लोकांशी संवाद साधून माहिती घेतली जात आहे.
रात्री जागते रहो...
अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळी रेल्वे सुरक्षा बलाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. रेल्वे रुळावर दगड, खांब यासह अन्य वस्तू येणार नाही, यादृष्टीने रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात येत आहे.