वर्षभरापूर्वी अल्पवयीन असल्याने जामीन, आता गर्भलिंगनिदान रॅकेटची बनली मास्टरमाइंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:16 AM2024-05-15T11:16:48+5:302024-05-15T11:20:34+5:30
जामीन मिळल्यानंतर पुन्हा सुरू केले घरात अनधिकृत गर्भलिंगनिदान केंद्र
छत्रपती संभाजीनगर : गारखेड्यातील मल्हार चौकाजवळील देवगिरी अपार्टमेंटमध्ये गर्भलिंगनिदान केंद्र चालवणाऱ्या सविता सोमीनाथ थोरात (४३) हिची मुलगी साक्षी (१९) पॉलिटेक्निकची विद्यार्थीनी आहे. २०२३ मध्ये हर्सूलमध्ये एका महिलेचा गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. त्यात सवितासह साक्षीदेखील आरोपी होती. पोलिसांना खोटी माहिती देण्यासाठी तेव्हा अल्पवयीन असलेल्या साक्षीने मृत महिलेच्या कुटुंबाला धमकावले होते. परंतु अल्पवयीन असल्याने ती तेव्हा अटकेपासून सुटली. मात्र, नंतर गर्भलिंगनिदान रॅकेटमध्ये अधिक सक्रिय झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
रविवारी मनपा व पुंडलिकनगर पोलिसांनी अनधिकृत गर्भलिंगनिदान केंद्र उघडकीस आणले. यात सविता, साक्षीसह सदाशिव अशोक काकडे (फुलंब्री), धर्मराज भाऊसाहेब नाटकर (पुणे), कृष्णा सुभाष नाटकर (नक्षत्रवाडी) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १ लॅपटॉप, दोन जेली बॉटल, गर्भलिंग निदान करण्यासाठीचा प्रोब, ७ मोबाइल, एक टॅब, १२ लाख ८० हजार रोख रक्कम आढळली होती. पोलिस निरीक्षक राजेश यादव यांनी सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले. सविता, साक्षीसह अशा प्रकारचे मोठे रॅकेटच सुरू असल्याचा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त केला. त्यांच्याशी संबंधित अन्य आरोपी, ग्राहक आणून देण्यात कोण मदत करते यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना १७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
२०२३ मध्ये सविता कारागृहात
जानेवारी २०२३ मध्ये जटवड्यात एका महिलेचा म्हशीने लाथ मारल्याने मृत्यू झाला होता. तत्कालीन बेगमपुऱ्याचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांना हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी सखोल तपास केला. तेव्हा सदर महिलेचा मृत्यू हा गर्भपाताने झाल्याची धक्कादायक बाब चार महिन्यांच्या तपासात निष्पन्न झाली. तेव्हा नर्स असलेल्या सवितासह गर्भपात करणारा डॉ. शामलाल जैस्वालला बोडखे यांनी अटक केली होती. दोघांची चौकशी होऊन दोघेही बरेच दिवस हर्सूल कारागृहात कैद होते. तेव्हा साक्षीदेखील गर्भपातावेळी उपस्थित होती. साक्षीने घाटीत जात मृत महिलेच्या कुटुंबाला म्हशीने मारल्याचा जबाब देण्यासाठी धमकावले होते. बोडखे यांच्या तपासात हे सर्व तांत्रिकदृष्ट्या निष्पन्न झाले. मात्र, साक्षी अल्पवयीन असल्याने तिला अटक करता आली नव्हती.
सोनवणेचे मोबाइल कशासाठी?
३१ जानेवारी रोजी वाळूजमध्ये अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉ. सतीश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो कारागृहात आहे. मात्र, त्याचे दोन मोबाइल सविताच्या घरात सापडले. तो त्यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे साक्षी, सविता त्याच्या नेटवर्क, एजंटच्या अजूनही संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस आता त्या दिशेने तपास करत आहेत. लवकरच यातील एजंटदेखील पकडले जातील, असे निरीक्षक राजेश यादव यांनी सांगितले.