गावचा कारभारी कोण होणार ? आता लक्ष सरपंचपदाच्या आरक्षणाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:05 AM2021-01-25T04:05:41+5:302021-01-25T04:05:41+5:30
सुनील घोडके खुलताबाद : महिनाभराच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकालाअंती समारोप झाला. आता सरपंचपदावर कोण विराजमान होईल हे आरक्षणानंतर ...
सुनील घोडके
खुलताबाद : महिनाभराच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकालाअंती समारोप झाला. आता सरपंचपदावर कोण विराजमान होईल हे आरक्षणानंतर स्पष्ट होणार असले तरी प्रत्येक सदस्याला सध्या सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये स्पष्टपणे बहुमत प्राप्त झाले आहे. मात्र, काठावर विजय मिळालेल्या ग्रामपंचायतींत सदस्य फुटाफूट होण्याची भीती निर्माण झाल्याने पॅनेलप्रमुखांकडून सावधानतेचा पवित्रा घेतला जात आहे.
तालुक्यातील २५ ग्रा.पं.चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. निवडणुकीआधी तालुक्यातील सर्व ३९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सो़डत जाहीर झाली होती. मात्र, आरक्षण रद्द झाल्याने सरपंचपदाचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा त्यावेळी स्वप्नभंग झाला. बहुमत मिळूनही नेमके आरक्षण काय सुटते, याबाबत चावडीवरच्या चर्चा रंगत आहेत.
नुकतीच मतमोजणी झाली आणि निकालही जाहीर झाले. आरक्षण सोडत अजून बाकी असल्याने बहुमत मिळुनही तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, गावचे भवितव्य कुणाकडे जाते व गावचा कारभारी कोण होणार हे येत्या काही दिवसांतच आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होईल. मात्र, सध्यातरी सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या विजयी उमेदवारांची धाकधूक कायम आहे.
सरपंचपद कोणत्याही प्रवर्गासाठी राखीव होऊ शकते. त्या प्रवर्गातून आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक गट-तट व नेते मंडळीने प्रयत्नांची पराकाष्टा केली. आता आरक्षण २९ जानेवारीला होणार आहे. कुठल्या ग्रामपंचायतीत कोणते आरक्षण सुटेल यासाठी आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असल्याने आपल्या गावच्या सरपंचपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर बसतो हे बघण्यासाठी राजकीय मंडळींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ग्रामपंचायत ताब्यात आली खरे याची अनेकांना शाश्वती नाही. त्यामुळे विजयी उमेदवारांची धाकधूक कायम आहे.
---------------
आरक्षणात विरोधकही सरपंच होण्याचा धोका
गावातून निवडून आलेल्या सदस्यांतून सरपंच पदाची बहुमताने निवड होणार आहे. ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद हे राखीव होईल, त्या प्रवर्गातून उमेदवार निवडून आला नसेल तर अनेक गट - तट आणि राजकीय पक्षांना बहुमत मिळवूनही सरपंच पदाला मुकावे लागणार आहे. याउलट बहुमत नसतानाही बिनविरोध सरपंच होण्याचा धोका वाढला आहे.
-----------
तरुणांना दिली आहे संधी
खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, कसाबखेडा, टाकळी राजेराय, बाजार सांवगी, गल्लेबोरगाव, गदाणा, सुलतानपुर, बोडखा, खिर्डी या मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद कुठल्या प्रवर्गासाठी सुटते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक जुन्या पुढाऱ्यांना घरचा रस्ता मतदारांनी दाखविला, तर नवीन तरुणांनी गावाची सत्ता काबीज केल्याचे चित्र आहे.