९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:32 PM2021-12-08T17:32:56+5:302021-12-08T17:35:01+5:30
नावांची शोधाशोध सुरू असून दिग्गजांच्या नकारांमुळे मराठवाड्याची संधी हुकणार
- राम शिनगारे
औरंगाबाद : वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवट वादानेच नाशिक येथे झाला. याच संमेलनात ९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. त्यानंतर मराठवाड्याच्या साहित्य वर्तुळात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्यातील लेखकाला मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात दिग्गज लेखकांच्या नकारामुळे मराठवाड्याची संधी हुकणार असल्याची शक्यता महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मराठवाडा साहित्य परिषदेकडे आहे. हा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न आहे. त्याची तयारी ९४वे साहित्य संमेलन होण्यापूर्वीच सुरू झालेली आहे. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाची पाहणी करून त्याचा अहवाल नाशिक येथे महामंडळाच्या बैठकीत सादर केला. ९५वे साहित्य संमेलन घेण्यासाठी केवळ उदगीर येथूनच निमंत्रण मिळाले होते. शेवटच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील एका संस्थेनेही संमेलन घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. मात्र, त्यापूर्वीच उदगीरच्या नावाची घोषणा झाल्यामुळे ते नाव मागे पडले.
उदगीर येथील मराठवाडा साहित्य परिषदेची स्थानिक शाखा आणि उदयगिरी महाविद्यालयाने संयुक्तपणे संमेलनाचा प्रस्ताव दिलेला आहे. या दोन्ही संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्या एका पक्षाला संमेलन दिले हा आरोप होऊ नये, याची काळजीही महामंडळाने घेतली. आता महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावांचा शोध सुरू केला आहे.
आगामी आठ दिवसात त्यावर बैठक होणार आहे. मराठवाड्यातील लेखकांमध्ये प्रामुख्याने रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, सुधीर रसाळ, नरेंद्र चपळगावकर, दत्ता भगत आदींच्या नावाचा समावेश होतो. यातील चार जणांनी अध्यक्ष होण्यास नकार दिलेला आहे. तसेच, मागील वेळी चर्चेतील भारत सासणे यांचे नाव आता मागे पडले आहे. त्याशिवाय इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, दासू वैद्य, पी. विठ्ठल आदी दुसऱ्या फळीतील साहित्यिक मराठवाड्यात आहेत. मात्र, त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ साहित्यिक उर्वरित महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील लेखकांचे नाव पुढे करण्याचा धोका महामंडळ पत्करणार नाही, असे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आधी मराठवाडा, नंतर अखिल भारतीयची संधी
उदगीर येथील मसाप शाखेने ४०वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यांच्या आयोजनावर ठाले पाटील समाधानी असल्यामुळेच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाल्याची चर्चा आहे. त्यानुसार ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची संधी औरंगाबाद येथील लोकसंवाद फाउंडेशन संस्थेला दिली होती. आता त्या संस्थेलाही आगामी काळात ठाले पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी देतील, अशीही चर्चा करण्यात येत आहे.