सभापती कोण होणार?
By Admin | Published: September 29, 2014 12:18 AM2014-09-29T00:18:31+5:302014-09-29T00:51:23+5:30
औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत.
औरंगाबाद : आघाडी तुटली आणि युती फुटल्यामुळे राज्यातील राजकारणांची सर्वच सूत्रे व समीकरणे बदलली आहेत. त्याची गडद सावली जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवर पडली आहे. दि.१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीतून नेमके कसे चित्र समोर येईल, याविषयी कुणालाही कल्पना करणे अवघड झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची २१ सप्टेंबर रोजी निवड झाली व २५ सप्टेंबर रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला. त्याचे पडसाद सभापतीपदाच्या निवडणुकीवर उमटणे स्वाभाविक आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता होती. या आघाडीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यापूर्वीच खेचले आहे; परंतु आता सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची तोंडे परस्पर विरोधी झाली आहेत.
युती व आघाडी फुटल्याने झालेल्या भूकंपातून अद्याप राजकीय मंडळी सावरलेली नाही. त्यात विधानसभेसाठी उमेदवाराची निवड, उमेदवारी दाखल करण्याची धावपळ करावी लागल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड दुय्यम ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीविषयी अद्याप कोणत्याही पक्षाने अद्याप काहीही रणनीती ठरविलेली नाही किंवा त्यावर चर्चाही झालेली नाही.
फुटाफुटीमुळे गणिते बदलणार
६० सदस्यीय जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष शिवसेना (१८ सदस्य) आहे. त्या खालोखाल काँग्रेस (१५), राष्ट्रवादी (११), मनसे (८) व भाजपा (६), असा क्रम आहे; परंतु राजकीय साठमारीमुळे चित्र बदलण्याची शक्यता दिसते आहे.
गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच त्यांच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी युतीला पाठिंबा दिला होता.
आता त्यांच्या प्रवेशाने भाजपाचे जिल्हा परिषदेतील बल ६ वरून ८ वर पोहोचले आहे. दुसऱ्या बाजूला सभापतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेचे पाच सदस्य सहलीवर गेलेले आहेत. त्यांची भूमिका पक्षाला मदत करण्याची राहील की, काँग्रेसला हे आताच सांगणे अशक्य आहे. जि. प. तील सर्व संबंधितांचे लक्ष आता १ आॅक्टोबरकडे लागले आहे.