कुलगुरू कोण होणार? चर्चेला आले उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 07:38 PM2019-04-29T19:38:19+5:302019-04-29T19:38:51+5:30
प्रशासन कार्यक्षमपणे चालविणारा असावा; मान्यवरांनी व्यक्त केल्या अपेक्षा
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ महिनाभरात संपत असल्याने विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण होणार, या चर्चेला विद्यापीठ वर्तुळात उधाण आले आहे. विविध नावांची चर्चाही करण्यात येत असताना राजकीय पाठिंबा कोणाला मिळणार यावरही खल करण्यात येत आहे.
डॉ. चोपडे यांचा कार्यकाळ ३ जून रोजी संपणार आहे. यामुळे कुलपती कार्यालयाने नव्या कुलगुरूंचा शोध घेण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. या समितीने १८ एप्रिल रोजी कुलगुरूपदासाठी अर्ज मागविले आहेत. २२ मेपर्यंत अर्ज मागविण्याची प्रक्रिया चालणार असून, त्यानंतर समिती मुलाखती घेणार आहे. या मुलाखतींमधून ५ व्यक्तींची निवड केली जाते. त्यातून एकाची निवड कुलपती कुलगुरूपदी करतात. यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून कोण कोण अर्ज करणार याविषयी अंदाज बांधण्यात येत आहेत.
विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, माजी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, आयक्वॅकचे संचालक डॉ. एम. डी. शिरसाठ, प्राणीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे, माजी बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील आदींच्या नावांची चर्चा होत आहे. विद्यमान सरकारच्या जवळचे असल्याने चर्चेमध्ये डॉ. सतीश पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. बीसीयूडी पदावरून त्यांना कुलगुरू डॉ. चोपडे यांनी काढले होते. तसेच प्रकुलगुरूपदासाठी नाव पाठवून पुन्हा रद्द करण्यात आले होते. यामुळे हुकलेली संधी यावेळी साधण्याचा प्रयत्न ते करणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
मात्र, त्यांना गुणवाढ प्रकरण, संशोधनात कॉपी केल्याचा आरोप आदी प्रकरणे अडचणीची ठरण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. याशिवाय विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकीसह, महाविद्यालयांतील काही प्राचार्यही इच्छुक असल्याची समोर येत आहे. विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापकांशी चर्चा केली असता, कुलगुरू कोणीही केला तरी चालेल, मात्र प्रशासनावर नियंत्रण मिळविणारा असावा, अशी अपेक्षा अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
विद्यापीठाचा कुलगुरू कोणीही झाला तरी चालतो. मात्र सामाजिक चळवळीची जाण आणि प्रशासनावर नियंत्रण मिळविणारा असला पाहिजे. विद्यापीठ हे चळवळीचे केंद्र असल्यामुळे हा अनुभव आवश्यक असणार आहे.
- डॉ. वाल्मीक सरवदे, अधिष्ठाता विद्यापीठ,
कुलगुरू हा मराठवाड्यातीलच असावा. कुलगुरूला स्थानिक प्रश्न, चळवळी, सामाजिक जाणची माहिती असली पाहिजे. कोणताही निर्णय घेताना तात्काळ घेतला जावा. विद्यापीठाच्या प्रशासनात असलेला ढिसाळपणे नष्ट करणारा असावा, एवढीच अपेक्षा आहे.
- डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय
स्वत:चे व्हिजन, मिशन घेऊन राबविण्याची क्षमता असणारा कुलगुरू मिळाला पाहिजे. विद्यापीठाच्या लहानसहान गोष्टींची माहिती असली पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत मराठवाड्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची धमकी येणाऱ्या कुलगुरूंमध्ये असली पाहिजे.
- कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, विभागप्रमुख, रसायनशास्त्र, विद्यापीठ