जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षानंतर आता सभापती कोण होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:44 PM2020-01-14T12:44:07+5:302020-01-14T12:46:39+5:30
काँग्रेसच्या सहा बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता ४ विषय समित्यांचे सभापती कोण होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बांधकाम व वित्त, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.१४) निवडणूक होणार आहे. यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतात की बाजूने याकडेही लक्ष लागले आहे. याच वेळी सत्तार समर्थक काँग्रेसच्या ६ सदस्यांनाही पक्षाने व्हीप जारी केल्यामुळे विरोधात मतदान केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचेही काँग्रेसच्या गटनेत्यांनी स्पष्ट केले.
जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक ६ सदस्यांच्या बळावर भाजपशी हातमिळवणी करून निवडणूक लढविली. यात समसमान मते पडल्यामुळे काढलेल्या चिठ्ठीमध्ये काँग्रेसच्या मीना शेळके अध्यक्षा बनल्या. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एल. जी. गायकवाड यांनी शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी काजे यांचा ३२ विरुद्ध २८ असा पराभव केला होता. यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यमंत्री सत्तार यांना ‘गद्दार’ ठरविले. शेवटी हा वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिटविण्यात आला. खैरे व सत्तार यांनी हातात हात घेऊन वाद मिटल्याचे जाहीर केले.
यानंतर ४ विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात राज्यमंत्री सत्तार यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांचे ६ समर्थक हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्या ६ सदस्यांना काँग्रेसकडून कोणतेही पद मिळणार नाही. तसेच शिवसेनेच्या कोट्यात केवळ दोनच सभापतीपदे असल्यामुळे मूळ सदस्यांना डावलून या सहयोगी पक्षाच्या सदस्यांना सभापतीपद मिळणे कठीण आहे. त्याच वेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल आणि जि. प. गटनेते श्रीराम महाजन यांनी पक्षाच्या सदस्यांना व्हीप जारी केला आहे. याचे प्रगटन दैनिकात प्रकाशित केले आहे. व्हीप डावलणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सत्तार समर्थक गोपीचंद जाधव, सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, केशवराव तायडे, धनराज बेडवाल आणि किशोर बलांडे या बंडखोर सदस्यांची गोची होणार आहे.
या सदस्यांनी पक्षविरोधी मतदान केल्यास सदस्य रद्द होण्याची कारवाईही केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष व गटनेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या ६ सदस्यांनी यापूर्वीही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा पक्षाचे उल्लंघन केल्यामुळे बडतर्फीची कारवाई करण्यास पक्षाला अधिक सोपे जाणार आहे. असे झाल्यास जि. प. च्या पदापासून अगोदरच वंचित राहावे लागलेल्या किशोर बलांडे यांच्यासह इतरांना सदस्यत्वापासूनही मुकावे लागण्याचीच अधिक शक्यता आहे.
फोडाफोडीला वेग; बांधकाम सभापतीवर सर्वांचा डोळा
जि.प.च्या ४ विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी निवडणूक होत आहे. यात बांधकाम आणि वित्त समितीच्या सभापतीवर सर्वांचा डोळा आहे. हे पद शिवसेनेच्या वाट्याला येते की, काँग्रेसच्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसकडून श्रीराम महाजन यांनी मोर्चेबांधणी केली आहे. तर शिवसेनेकडून शुभांगी काजे, अविनाश गलांडे यांच्यासह इतर इच्छुक आहेत. भाजपकडूनही फोडाफोडी करून हे पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय सत्तार गटाकडून किशोर बलांडे इच्छुक असल्याचे समजते.