औरंगाबाद मनपा आयुक्तपदी आता कोण येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 06:09 PM2018-04-17T18:09:56+5:302018-04-17T18:12:50+5:30
औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले.
औरंगाबाद : शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर असतानाही राज्य शासन महापालिकेला स्वतंत्र आयुक्त देण्यास तयार नाही. सोमवारी राज्यातील २५ पेक्षा अधिक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले.
महापालिकेत महिला आयुक्ताची नेमणूक केल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगलेली असताना सायंकाळपर्यंत मनपाला यासंदर्भात कोणतेच आदेश प्राप्त झाले नव्हते. शहरात कचराकोंडीची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून राम मनपाचा कारभार पाहत होते. सोमवारी सकाळी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेत आयुक्त म्हणून राम पाणीप्रश्नावर प्रशासनाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत असताना शासनाकडून त्यांना बदलीची माहिती देण्यात आली. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना विनंती करून सभागृह सोडले.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण यांच्याकडेच मनपाचा अतिरिक्त कार्यभार राहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. मंगळवारी राज्यातील आणखी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे कळते. या बदल्यांच्या सत्रात औरंगाबाद महापालिकेला आयुक्त मिळेल, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी दिवसभर मनपा आयुक्तपदी महिला आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. रात्री उशिरापर्यंत मनपाला अशी कोणतीही आॅर्डर प्राप्त झालेली नव्हती.