छत्रपती संभाजीनगर शहरामधील तीनही मतदारसंघांवर कोण राखील वर्चस्व?
By स. सो. खंडाळकर | Published: October 16, 2024 01:05 PM2024-10-16T13:05:45+5:302024-10-16T13:08:15+5:30
आगामी मनपा निवडणुकीची नांदीही ठरेल ही विधानसभा निवडणूक
छत्रपती संभाजीनगर : शहरातील औरंगाबाद पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघांवर या निवडणुकीत कोण वर्चस्व राखणार यावरील पडदा २३ नोव्हेंबर २०२४ रोजी हटणार आहे. ही निवडणूकही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच होण्याची अधिक शक्यता आहे. तत्कालीन अखंड शिवसेना आता दुभंगल्याने मतदार कोणत्या शिवसेनेला (शिंदेसेना व उद्धवसेना) कौल देणार, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीचीही ही निवडणूक नांदी ठरेल. विधानसभा निवडणुकीत जो पक्ष वर्चस्व राखेल, तो महापालिकेतही उत्तम कामगिरी बजावू शकेल, असे मानले जात आहे.
आता कोणत्या सेेनेचा बालेकिल्ला?
दर निवडणुकीला राजकारण बदलत असते. मतदारांची संख्या व राजकीय मुद्दे बदलत असतात. उमेदवारांची संख्या, बंडखोऱ्या व जातीय समीकरणे लक्षात घ्यावी लागतातच. हल्ली पैसा फॅक्टरही मोठ्या प्रमाणावर काम करतो. कुठलीही निवडणूक म्हटल्यानंतर हे आता ओघानेच आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्याने हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होताच. महापालिकेवरही सतत शिवसेनेचेच वर्चस्व राहत आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयआयच्या विजयाने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला. २०२० ला महापालिकेची मुदत संपली व तेव्हापासून तिथे प्रशासक राज आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडून भाजपला मिळाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील इथल्या शिवसेनेची पिछेहाटच बघायला मिळते आहे.
पूर्वमधून अधिक उमेदवारांची शक्यता?
औरंगाबाद पूर्वमध्ये सध्या भाजपचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत. ते राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते हे निश्चित नाही. तेथील मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता महाविकास आघाडीचा उमेदवार मुस्लिम राहील का, याकडेही लक्ष आहे. एमआयएमसारखा पक्षही तेथून लढणारच आहे. पूर्व मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची संख्याही अधिक राहू शकते. जातीय समीकरणे बिघडण्यासाठीही उमेदवार उभे राहतील किंवा केले जातील.
पश्चिममध्ये चमत्कार घडेल?
पश्चिममधून संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. त्यांची मंत्रिपदाची तीव्र इच्छा प्रवक्तेपद व अलीकडेच सिडकोचे अध्यक्षपद देऊन पूर्ण करण्यात आली आहे. आता त्यांची लढत महाविकास आघाडीतील उद्धवसेनेच्या उमेदवाराशीच होईल. या मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळणार आहे. ‘मध्य’चे आमदार प्रदीप जैस्वाल आहेत. आता ते शिंदेसेनेत आहेत. तेथे उद्धवसेना दावा करीत आहे. ही जागा सोडवून घेण्यासाठी काँग्रेसही प्रयत्नशील आहे. ती काँग्रेसला सुटल्यास तेथे मुस्लिम चेहरा दिला जाईल. या तीनही मतदारसंंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एखादी तरी जागा सुटते का, याबद्दलही उत्सुकता आहे.