बाळ कोण सांभाळेल; त्याचे पोट कसे भरेल? हिरकणी कक्ष उभारण्यात स्थानिक स्वराज्य संस्था उदासीन
By विजय सरवदे | Published: April 22, 2023 07:44 PM2023-04-22T19:44:28+5:302023-04-22T19:44:42+5:30
अलिकडच्या काळात शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढत आहे. परंतु, कार्यालयांमधील वातावरण आणि सुविधा महिलांसाठी पूरक नाहीत.
छत्रपती संभाजीनगर : नुकताच ११ एप्रिल रोजी सगळीकडे राष्ट्रीय माता सुरक्षा दिन पार पडला. मात्र, शासकीय कार्यालयांत स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष असावा, याची कोणालाही आठवण येऊ नये, हे दुर्दैव!
अलिकडच्या काळात शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढत आहे. परंतु, कार्यालयांमधील वातावरण आणि सुविधा महिलांसाठी पूरक नाहीत. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना आपल्या तान्हुल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण शासनाने सन २०१२ मध्ये आखले. त्यावर सन २०१४ मध्ये तेव्हाच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर भर दिला. परंतु, या आदेशाची एसटी महामंडळा व्यतिरिक्त अन्य कार्यालयांनी आजपर्यंत पाहिजे तेवढी दखल घेतलेली दिसत नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनप्रसंगी मंत्रालयात आमदार सरोज अहिरे यांना हिरकणी कक्षाचा कटू अनुभव आला. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय आणि त्यांतर्गत पंचायत समित्या, ग्रामपंचायतींचा आढावा घेतला असता या कक्षाबाबत विदारक चित्र समोर आले. कुठेही हा कक्ष स्वतंत्रपणे, सुसज्ज, सुरक्षित असल्याचे दिसून आले नाही. कुठे एखादी खोली आहे. पण, त्यात अडगळीचे साहित्य ठेवलेले आहे.
८७० ग्रामपंचायतींमध्ये ५७७ महिला सदस्य
जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती असून त्यामध्ये ५७७ महिला सदस्य निवडून आलेल्या आहेत.
९ पंचायत समित्यांमध्ये ६३ महिला सदस्य
जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये ६३ महिला सदस्य निवडून आल्या होत्या.
जिल्हा परिषदेवर ३३ महिला सदस्य
जिल्हा परिषदेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत ३३ महिला सदस्य निवडून आल्या होत्या.