जो येईल त्याला लस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:02 AM2021-02-10T04:02:06+5:302021-02-10T04:02:06+5:30
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात सुरु होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षांवरील ...
औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात सुरु होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना डोस देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अद्यापही नोंदणीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. या तिसर्या टप्प्यात यावेळी नोंदणीऐवजी जो येईल त्याला लस, अशी पद्धत राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना आणि दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यात ३३ हजार आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येत आहे. या दोन्ही टप्प्यातील लसीकरणासाठी लसीच्या लाभार्थ्यांची नावे को-विन अॅपवर अपलोड करावी लागली. ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. यामध्ये बर्याच अडचणी येत आहे. लसीकरणाचा संदेश लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची स्थिती आहे. अॅप संथगतीने चालत असल्याने लसीकरणाची प्रक्रियाही संथ होते. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लाभार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. तिसर्या टप्प्यात मात्र ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्याही अधिक राहणार आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यासाठी कोणतीही नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली नाही. तिसर्या टप्प्यात लसीकरणासाठी जागेवरच नोंदणी करून डोस देण्याचा विचार आरोग्य यंत्रणेकडून सुरु आहे. त्यावर लवकरच शिक्कमोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लसीकरणाचे केंद्र वाढणार
लसीकरणाचे केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले. लसीकरणाचा तिसरा टप्पा ६ मार्चनंतर सुरु होईल. यात ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. तोपर्यंत लस साठविण्याची क्षमतेतही वाढ होईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले.