रविवारपासून ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:02 AM2021-08-01T04:02:57+5:302021-08-01T04:02:57+5:30
औरंगाबाद : मालट्रकमध्ये माल रचणे, ट्रकमधील माल फळक्यापर्यंत उतरविणे (वराई) यासाठी हमालांना हमाली द्यावी लागते. यावरून वाहतूकदार व ...
औरंगाबाद : मालट्रकमध्ये माल रचणे, ट्रकमधील माल फळक्यापर्यंत उतरविणे (वराई) यासाठी हमालांना हमाली द्यावी लागते. यावरून वाहतूकदार व व्यावसायिकांमध्ये होणाऱ्या वादावर मालवाहतूकदार संघटनेने तोडगा काढला असून, ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ असा नवीन नियम १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे.
येत्या काळात वराईचा प्रश्न चिघळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. यासंदर्भात नवी दिल्ली येथील ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार औरंगाबाद गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची शनिवारी बैठक झाली. तेव्हा अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करणे ही वाहतूकदारांची जबाबदारी आहे; परंतु बऱ्याच ठिकाणाहून वाहतूकदारांकडून बळजबरीने लोडिंग, अनलोडिंगची हमाली (वराई) वसूल केली जात असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या.
यामुळे यापुढे आता ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ हे देशव्यापी एकच धोरण संघटनेने ठरविले आहे. याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू होईल. कंपन्या, दुकानदार यांनाच वराई द्यावी लागणार आहे. मालवाहतूकदारांवर फक्त माल वाहतुकीची जबाबदारी असणार आहे. येथे झालेल्या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष असद अहेमद, उपाध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, महासचिव जयकुमार धानवी व अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
चौकट
समन्वयातून वराईचा प्रश्न सोडवावा
आतापर्यंत ट्रकमध्ये माल रचण्यासाठी व तो फळक्यावर आणून देण्यासाठी मालवाहतूकदारच वराई देत होता. वाहतूकदारांना वराई देणे परवडत नसेल, तर त्यांनी दुकानदारांकडून वराईचे दर वाढवून घ्यावेत. शेवटी मालवाहतूकदार किंवा व्यापारी या दोघांपैकी कोणालातरी वराई द्यावी लागणारच आहे. हा प्रश्न मालवाहतूकदार व व्यापाऱ्यांनी समन्वयातून सोडवावा.
-सुभाष लोमटे,
सरचिटणीस, राज्य हमाल मापाडी महामंडळ
चौकट..............................
हमाल बेरोजगार होतील
वराई घेणारे हमाल मालवाहतूकदारांचे होते. जर व्यापाऱ्यांनी वराई देण्याचे ठरविले, तर ते स्वत:कडील हमालाकडूनच वराईचे काम करून घेतील. त्यामुळे मालवाहतूकदारांकडे असणारे हजारो हमाल बेरोजगार होतील.
-नीलेश सेठी,
अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन