नेतृत्व कुणाचे ? युवा सेनेत सुरू झाली वर्चस्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 09:12 AM2021-03-14T09:12:42+5:302021-03-14T09:15:02+5:30

उपसचिव पदावर माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे यांची वर्णी लागली. त्यामुळे माजी नगरसेवक तथा उपसचिव राजेंद्र जंजाळ यांना डावलण्यास सुरूवात झाल्याची कुजबूज सुरू झाली.

Whose leadership? The battle for supremacy began in the Yuva Sena | नेतृत्व कुणाचे ? युवा सेनेत सुरू झाली वर्चस्वाची लढाई

नेतृत्व कुणाचे ? युवा सेनेत सुरू झाली वर्चस्वाची लढाई

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील बैठकीसाठी दोन गट रवानाकार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अनेकांत नाराजी

औरंगाबाद : शिवसेनेची उपसंघटना असलेल्या युवा सेनेची गेल्या महिन्यात जंबो कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईतूनच शुक्रवारी दोन गट मुंबईला शिवसेना भवनमधील एका बैठकीला रवाना झाले.

उपसचिव पदावर माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे यांची वर्णी लागली. त्यामुळे माजी नगरसेवक तथा उपसचिव राजेंद्र जंजाळ यांना डावलण्यास सुरूवात झाल्याची कुजबूज सुरू झाली. कार्यक्रमांना निमंत्रण न देणे, होर्डिंग्जवर फोटो न टाकणे असे प्रकार सुरू झाले. यातून एकमेकांवर कुरघोडी करण्यास सुरुवात झाली. हा सगळा प्रकार वरिष्ठ पदाधिकारी वरूण देसाई, निखील वाळेकर यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे तातडीने मुंबईत बैठक लावण्यात आल्याची चर्चा आहे. दोन गट पडल्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची कोंडी होऊ लागली आहे. एकमेकांच्या दबावातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमांना जाऊ नका, असे निरोप देण्यात येत असल्याने हा सगळा प्रकार वरिष्ठांपर्यंत गेला. युवा सेनेतील नेतृत्व लढाईवर मुंबईतील बैठकीनंतरच उपाय निघणे अपेक्षित आहे.

जंजाळ हे सर्व नवीन पदाधिकाऱ्यांसह मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून ऋषिकेश खैरे यांना फोन आल्यानंतर ते आज सकाळी विमानाने मुंबईला गेले, अशी माहिती युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांमधून ऐकण्यास मिळाली. मुंबईतील बैठकीत काही बदल करायचे का, याबाबत निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उपसचिव खैरे यांनी सांगितले, कुठलीही गटबाजी नाही. नवीन कार्यकारिणीनंतर पहिलीच बैठक होती. त्यामुळे सर्व मुंबईला आले होते. संघटनेत कुठलीही गटबाजी अथवा वर्चस्वाची लढाई नाही.

कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर अनेकांत नाराजी
कार्यकारिणी जाहीर झाल्यापासून युवा सेनेत नाराजांची संख्या वाढू लागली आहे. कार्यकारिणीत ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह अनेकांना डावलले. त्यांना कुठल्याही कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जात नाही. तसेच तिन्ही मतदारसंघासह ग्रामीण भागातील नाराजांनी इतर पक्ष पदाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू केल्याची चर्चा आहे. युवा सेनेत ज्यांना स्थान मिळाले, ते सर्व संघटनेतील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकाऱ्यांचे चिरंजीव, नातेवाईक आहेत. एखाद - दुसरा वगळला तर युवा सेना थेट उत्तराधिकारी सेना झाल्याने अनेकांनी सोशल मीडियातून राग व्यक्त केला.

Web Title: Whose leadership? The battle for supremacy began in the Yuva Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.