सगळेच तानसेन कशाला ? कानसेनही तितकेचे महत्त्वाचे; ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 05:38 PM2017-12-11T17:38:16+5:302017-12-11T17:43:05+5:30

लोकमत मुलाखत : जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात त्यांची ओखळ. अशा या विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गंधर्व संगीत महोत्सवा’निमित्त शहरात आल्या होत्या. यावेळी ‘लोकमत’शी त्यांनी मुक्त संवाद साधला.

Why all tansen? Kansen is equally important; Veteran singer Dr. The opinion of Ashwini Bhide-Deshpande | सगळेच तानसेन कशाला ? कानसेनही तितकेचे महत्त्वाचे; ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे मत 

सगळेच तानसेन कशाला ? कानसेनही तितकेचे महत्त्वाचे; ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे मत 

googlenewsNext
ठळक मुद्दे जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या ओळखल्या जातातजाणकार रसिकांची मांदियाळी हवी. शास्त्रीय संगीत ऐकणारे आणि ते अनुभवणारे यात फरक असतो. ते अनुभवणारे कानसेन निर्माण व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा.‘क्लासमध्ये संगीतओळख केली जाऊ शकते. परंतु, खरी संगीत साधना तेथे होऊ शकत नाही. त्यासाठी गुरु-शिष्य पंरपरेला पर्याय नाही.

- मयूर देवकर  

औरंगाबाद : बालपणापासून आजी आणि आईने केलेल्या संगीत संस्कारांची माया एवढी गाढ होती की, अश्विनीतार्इंना सुरांना श्वासापासून वेगळे करणे शक्य नव्हते. तानपु-याशी जुळलेली नाळ, त्याचा आजीवन स्नेह त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला. जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात त्यांची ओखळ. अशा या विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गंधर्व संगीत महोत्सवा’निमित्त सोमवारी शहरात आल्या होत्या. यावेळी ‘लोकमत’शी त्यांनी मुक्त संवाद साधला.  

औरंगाबादमध्ये मी यापूर्वीही मैफली केल्या. या शहरात जाणकार रसिकांची मोठी परंपरा आहे, असे प्रांजळ मत व्यक्त करून त्यांनी चर्चेला सुरुवात केली. जगभरातील प्रतिष्ठेच्या संगीत महोत्सवात सादरीकरण केलेल्या अश्विनीतार्इंसाठी शहर अथवा जागा महत्त्वाची नाही. जाणकार रसिकांची मांदियाळी हवी. शास्त्रीय संगीत ऐकणारे आणि ते अनुभवणारे यात फरक असतो. ते अनुभवणारे कानसेन निर्माण व्हावेत, अशी त्यांची अपेक्षा.  चित्रपट, रिअ‍ॅलिटी शो आणि इंटरनेटमुळे शास्त्रीय संगताचा प्रचार होण्यास मदत मिळाली. ‘ग्लॅमर’सदृश्य लोकप्रियता दिसू लागली. परंतु, शास्त्रीय संगीताला अद्यापही ‘ग्लॅमर’ आले नसल्याचे त्या मानतात. ‘हल्ली माध्यमांतून शास्त्रीय संगीताची प्रसिद्धी वाढली आहे. त्याबद्दल लोकांमध्ये जागृती वाढत आहे. अभिरुचीसंपन्न नसली तरी किमान लोकांना तोंड ओळख तरी होतेय. रिअ‍ॅलिटी शोमधून नवीन गायकांना संधी मिळतेय हीदेखील चांगली गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.  

सिनेमा किंवा रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहिले म्हणून ‘ग्लॅमर’च्या आशेने या क्षेत्राकडे वळणा-या नवगायक व त्यांचा पालकांना अश्विनीताई एक सल्ला देतात. ‘अनेक वाहिन्यांवर चालणा-या संगीत कार्यक्रमांतून ‘महागायक’ तयार केले जातात. पण, गायक असे तयार केले जाऊ शकतात का? संगीत हे असे क्षेत्र आहे जेथे प्रत्येकाला आपली वाट स्वत: निर्माण करावी लागते. टीव्ही शोमधून बाहेर पडणा-या गायकांमध्ये ती क्षमता, ती जाणीव असते का याचा विचार केला पाहिजे.  

यश मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ नाही!  
लहानपणापासूनच अश्विनीतार्इंचा गायनप्रवास सुरु झाला होता. नारायणराव दातार आणि नंतर आईच्या कडक शिस्तीत त्या तयार झाल्या. कठोर रियाज आणि संपूर्ण समर्पणातून कमावलेली गायनकला त्यांना अशी सहजासहजी नाही मिळाली. एक रात्रीतून त्या ‘महागायिका’ बनल्या नाहीत. आज त्यांचे जे स्थान आहे, त्यांचा जो मानसन्मान आहे तो मिळवण्यासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नाही. त्या म्हणतात, ‘कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ असूच शकत नाही. त्यासाठी स्वत:ला अपार कष्ट करावे लागतात. 

आजकाल ‘संगीत विद्यालय’ आणि ‘संगीत क्लास’ची संख्या कैकपटीने वाढली आहे. त्याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘क्लासमध्ये संगीतओळख केली जाऊ शकते. परंतु, खरी संगीत साधना तेथे होऊ शकत नाही. त्यासाठी गुरु-शिष्य पंरपरेला पर्याय नाही. वर्षानुवर्षे गुरुकडून संगीताचे ज्ञना मिळवणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणे गरजेचे असते.’ यावेळी आयोजक प्राचार्या डॉ. रोहिणी कुलकर्णी पांढरे म्हणाल्या की, मुलांना अशा मोठ्या गायकांना ऐकण्याची संधी मिळावी म्हणूनच गेल्या वर्षीपासून हा महोत्सव आयोजित केला जातो. 

या क्षेत्रातील गायक केवळ गायनावर भर देतात. पंरतु, शास्त्रीय संगीताचा इतिहास, त्याचे साहित्य, त्याचे शास्त्र, त्याचा अभ्यास, त्याचे सौंदर्यशास्त्र याविषयी संशोधन किंवा लिखाण करणारे गायक फार कमी आहेत. अश्विनीताईं मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी स्व-रचित बंदिशीचे ‘रागरचनांजली’ हे दोन भागांचे पुस्तक लिहिले आहे.  त्या म्हणतात, ‘संगीत क्षेत्रात येणाºया बहुतांश कलाकारांना मंचाचे आकर्षण असते. परंतु, संगीत शिकणा-या प्रत्येकानेच गायक होण्याची गरज नाही. सगळेच गायक झाले तर ऐकणार कोण? प्रत्येकामध्ये सादरीकरणाची क्षमता असेलच असे नाही. त्यांनी निराश न होता या क्षेत्रातील इतर पर्यायांचा विचार करावा. ते उत्तम रसिक होऊ शकतात. संशोधक, अभ्यासक, लेखक म्हणून शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मदत करू शकतात. त्यामुळे सगळ्यांनीच तानेसन होण्याची गरज नाही. कानसेन होणेदेखील तेवढेच गरजेच आहे.’

Web Title: Why all tansen? Kansen is equally important; Veteran singer Dr. The opinion of Ashwini Bhide-Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.