सेनेच्या वाघाने आपल्या गडात एकटे लढवून दाखवावे, मित्रपक्ष कशाला हवेत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 12:29 PM2021-06-24T12:29:59+5:302021-06-24T12:39:06+5:30
MP Imtiaz Jalil on Shivsena पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू.
औरंगाबाद : शिवसेनेने आपल्या गडामध्ये मनपा निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी. राज्याच्या आघाडीतील मित्रपक्षांची गरज कशाला पडतेय, अशाप्रकारे एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत शिवसेनेला डिवचले. धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांच्याकडून होत नसेल तर मी मंदिर उघडून देतो, असा चिमटाही त्यांनी काढला. ( MP Imtiaz Jalil challenges Shivsena )
महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. २०१५ च्या तुलनेत आणखी मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील, असा दावा खा. जलील यांनी केला. पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू. सध्या शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जालना रोडचे काम सुरू आहे. विमानतळासमोर ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे. त्याला एमआयएमचा विरोध आहे. आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात याची गरज आहे. स्थानिक सर्व आमदारांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे. प्राधिकरणाने जागा न बदलल्यास थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आम्ही जाऊन बसणार आहोत. मुकुंदवाडी स्मशानभूमी ते थेट केंब्रिजपर्यंत स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही पत्रकार परिषदेत खा. जलील यांनी केली. जालना रोडवरील वक्फ मालमत्ता खरेदी करणारे, विक्री करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. वक्फ बोर्डाचे कर्मचारी चोर नव्हे तर डाकू आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजेद, शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी उपस्थित होते.
उत्तर प्रदेश, दिल्लीत लढू
शरद पवार यांच्या नवीन राष्ट्रीय आघाडीबद्दल पत्रकारांनी जलील यांना छेडले असता मुस्लिमांशिवाय कोणतीही आघाडी देशात शक्य नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा लढविणार असल्याचेही खा. जलील म्हणाले.