पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 03:08 PM2021-08-18T15:08:35+5:302021-08-18T17:24:55+5:30

नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे.

Why are passenger trains still 'locked'? Express train running under the name of special train | पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का ? विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच ‘सुसाट’

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादहून आजघडीला सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार अनलाॅक झाले आहेत. मात्र, अद्यापही पॅसेंजर रेल्वे लाॅक आहेत. गेल्या १७ महिन्यांपासून विशेष रेल्वेच्या नावाखाली एक्स्प्रेस रेल्वेच धावत आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचा आता संयम सुटत आहे. एक्स्प्रेस, एसटी, दुचाकीने रोज ये-जा करणे, हे आर्थिकदृष्ट्या परवड नसल्याने पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर रेल्वे आवश्यक आहेत. औरंगाबादहून आजघडीला सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड-रोटेगाव डेमू आणि रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे सुरू करण्यात आली. त्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु या रेल्वेची वेळ गैरसोयीची ठरत आहे. ही वेळ बदलण्यासह सर्व पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.

बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
औरंगाबादमार्गे धावणाऱ्या निजामाबाद-पुणे पॅसेंजर, नांदेड-दौंड पॅसेंजर, काचीगुडा-नगरसोल पॅसेंजर, जालना-नगरसोल डेमू पॅसेंजर बंद आहे.

सुरू असलेल्या एक्स्प्रेस
सध्या सचखंड एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, अजंता एक्स्प्रेस, रेणीगुंठा एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस धावत आहेत.

बंद असलेली एक्स्प्रेस
औरंगाबादमार्गे धावणारी चेन्नई एक्स्प्रेस सध्या बंद आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यातून धावणारी, दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी देणारी ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी केली.

मागणी असेल तेथे वाढविल्या जातील
प्रत्येक सेक्शनमध्ये एक पॅसेंजर चालेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मागणी असेल तेथे पॅसेंजर वाढविल्या जातील. मात्र, कोविडची परिस्थिती आणि गाईडलाईनवरून यासंदर्भात निर्णय घेतले जातील.
- उपिंदर सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड, दमरे

विद्यार्थ्यांची गैरसोय
पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने औरंगाबादला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळच्या वेळेत औरंगाबादेत पोहोचण्यासाठी पूर्वीच्या पॅसेंजर लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजे.
-प्रीती जैस्वाल, प्रवासी

पॅसेंजर सुरू करा
एसटीने विशेष रेल्वेने ये-जा करणे परवडणारे नाही. दुचाकीने प्रवास करताना वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका असतो. त्यामुळे रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर पुन्हा सुरू कराव्यात.
- अक्षय वायकोस, प्रवासी

Web Title: Why are passenger trains still 'locked'? Express train running under the name of special train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.