पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या आमदाराला पक्षातून का काढले नाही? अंबादास दानवेंचा सवाल
By बापू सोळुंके | Published: February 4, 2024 06:05 PM2024-02-04T18:05:38+5:302024-02-04T18:06:06+5:30
समाजात द्वेष पसरविण्याचे काम भूजबळ करीत आहे.
बापू सोळुंके' छत्रपती संभाजीनगर:कल्याणमध्ये राजकीय स्पर्धेतून थेट पोलीस ठाण्यातच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली. या घटनेने महाराष्ट्राला बिहारची उपमा लोक देत असल्याने राज्याची बदनामी झाली आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भाजप ने आमदाराला पक्षातून का काढले नाही, असा सवाल विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
विरोधीपक्षनेते दानवे म्हणाले की, भाजप हा पक्ष नेहमी साधनसुचीतेच्या गप्पा मारतो. देशात रामराज्य आल्याचे त्यांचे लहान, मोठे नेते सांगतात. हेच का तुमचे रामराज्य असा खोचक सवालही त्यांनी केला. पोलीस ठाण्यात भाजपचाच आमदार गणपत गायकवाड हे शिंदे गटाचा पदाधिकारी महेश गायकवाडवर गोळीबार करतो. या घटनेतील महेश गायकवाड हे धुतल्या तांदळासारखे आहे असे आम्ही म्हणत नाही. पण या घटनेचा आम्ही निषेध करतो. कारण या घटनेने महाराष्ट्राची देशात बदनामी झाली आहे.
मंत्री छगन भूजबळ यांनी कालच्या सभेत विष ओकले आहे. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. खरे तर हे सरकार मराठा आरक्षण आणि ओबीसीसंदर्भात तु मारल्या सारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असे करत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात लोकसभा मतदार संघनिहाय दौरा करीत आहे. त्यांच्या दौऱ्याच धसका भाजप आणि शिंदे गटाने संताजी, धनाजीसारखा घेतला आहे. यामुळे छोट्या पदाधिकाऱ्यांपासून मोठे नेते सतत ठाकरेंवर टीका करीत असतात,असे आ. दानवे म्हणाले.
समाजात द्वेष पसरविण्याचे काम भूजबळ करीत आहे
भूजबळ यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी काल नाभिक समाजाविषयी केलेेल्या वक्तव्य हे राज्यात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अठरापगड समाज आणि अन्य समाजामध्ये भांडण लावण्यासारखे आहे. तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी एखाद्या समाजाला ओढू नका, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम ते करत आहे. भूजबळासंदर्भात उपमुख्यमंत्री अजीत पवार मूग गिळून गप्प का आहे, असा आमचा सवाल आहे.