खड्ड्यांपेक्षा दुभाजक महत्त्वाचे का? चांगले दुभाजक काढून नवीन बसविणे सुरू, झाडेही तोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 12:52 PM2022-08-13T12:52:44+5:302022-08-13T12:53:10+5:30
निधी शासनाचा, चुराडा मनपाकडून;१९ कोटी ९९ लाखांचे अंदाजपत्रक; २४ मोठ्या रस्त्यांचा समावेश, २६ किलोमीटर दुभाजक बसविणार
औरंगाबाद : पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाकडून औरंगाबाद महापालिकेला २० कोटींचा घसघशीत निधी मिळाला. या निधीतून मुख्य रस्त्यांवर दुभाजक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात काम सुरू झाले. ज्या ठिकाणी चांगले उंच, देखणे दुभाजक आहेत, तेथील काढून नवीन बसविण्याचे काम मनपाने हाती घेतले. विशेष बाब म्हणजे, दुभाजकांतील मोठ-मोठी झाडे अत्यंत निदर्यीपणे तोडण्यात येत आहेत. या प्रकारामुळे खड्ड्यांमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या संतापात अधिक भर पडत आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी राज्य शासनामार्फत मिळाला. तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ज्या भागात नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यात आले, तेथे दुभाजक बसविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तज्ज्ञ अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार केले. १९ कोटी ९९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबविली. साडेबारा टक्के कमी दराने काम करण्याची तयारी के.एस. कन्स्ट्रक्शनने निविदा प्रक्रियेत दाखविली. त्यामुळे संबंधित एजन्सीला काम देण्यात आले. १४ कोटी ५४ लाख रुपयांमध्ये हे काम होणार आहे. एकूण २४ मोठ्या रस्त्यांवर हे दुभाजक बसविले जातील. २६ किलोमीटर लांबी आहे.
मागील आठवड्यापासून नियुक्त कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. सिडको एन-६, एन-६ स्मशानभूमी ते टी.व्ही. सेंटर या रस्त्यावर मागील काही वर्षांपासून दुभाजक नसल्याने लहान-मोठे अपघात होत होते. नागरिकांनीही या कामाचे स्वागत केले. दोन ते तीन दिवसांपूर्वी गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल्स या रस्त्यावरील चांगले दुभाजक काढून नवीन बसविण्याचे काम सुरू झाले. गरज नसताना महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी का केली जातेय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे दुभाजकात तीन ते चार वर्षांपूर्वी लावण्यात आलेली झाडे तोडण्यात येत आहेत.
खड्ड्यांपेक्षा दुभाजक महत्त्वाचे का?
शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून औरंगाबादकरांना खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. खड्डे बुजविण्याचे औदार्य मनपाने दाखविले नाही. संस्था, नागरिक व्यापारी स्वत:हून खड्डे बुजवून गांधीगिरी करीत आहेत. त्यात दुभाजकांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे पाहून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार सुरू आहे.
काय म्हणाले कार्यकारी अभियंता
प्रश्न- शहरात किती रस्त्यांवर नवीन दुभाजक उभारण्यात येणार आहेत?
फड- शंभर, दीडशे कोटीतील बहुतांश रस्त्यांवरील दुभाजक उभारणार.
प्रश्न- जिथे गरज नाही, तेथेही दुभाजक उभारणी सुरू आहे.?
फड- अपघात टाळण्यासाठी उंच दुभाजकही गरजेचे आहेत.
प्रश्न- दुभाजक महत्त्वाचे का खड्डे?
फड- दुभाजकाचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच झाला आहे.
प्रश्न- कंत्राटदार दुभाजकातील झाडे तोडतोय.
फड- एक झाड तुटले, तर पाच लावायला सांगितली आहेत.