कृषी जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बँका कर्ज का नाकारतात ? RBI महाव्यवस्थापकांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:23 IST2025-03-21T15:20:49+5:302025-03-21T15:23:22+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने गुरुवारी सिडकोतील एका हॉटेलमध्ये सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या असलेल्या विविध योजना, तसेच बँकेच्या सुविधांसदंर्भात जनजागृती व्हावी, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बँका कर्ज का नाकारतात ? RBI महाव्यवस्थापकांना सवाल
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहू शकतात. कृषीच्या जमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बँकांकडून कर्ज नाकारण्यात येते, विनातारण लघु उद्योगांसाठी कर्ज देण्याचे निर्देश बँकांना द्यावे, चेक बाऊन्स प्रकरणात विविध बँकांचे वेगवेगळे चार्जेस असतात. यात एकसमानता का आणत नाही ? कर्जाच्या मुदतपूर्वी परतफेडीवर चार्जेस का घेता, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लघु उद्योजक आणि व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने गुरुवारी सिडकोतील एका हॉटेलमध्ये सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या असलेल्या विविध योजना, तसेच बँकेच्या सुविधांसदंर्भात जनजागृती व्हावी, यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर आरबीआयच्या मुंबई विभागाचे मॅनेजर बिस्वजित दास, महाव्यवस्थापक सिबो नेखिनी, व्यवस्थापक अमित कुमार मिश्रा, सहायक व्यवस्थापक लक्ष्मण भोये, सहायक नीलेश प्रभू राव उपस्थित होते.
यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर केवळ जमीन कृषीची आहे, म्हणून बँका त्यांना कर्ज नाकारतात. शिवाय नवउद्योजकांना विनातारण कर्ज मिळावे यासाठी आरबीआयने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. ऑरिक सिटीतील भूखंडांचे मूल्यांकन बँकांकडून शासकीय दरापेक्षा कमी करण्यात येत असल्याकडे नवउद्योजकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तनसुख झांबड यांनी दर सहा महिन्यांतून एकदा केवायसी करण्यासाठी बँका आमचे चेक वटवत नसल्याकडे लक्ष वेधले. अजय शहा यांनी उद्योगांप्रमाणे ट्रेडिंग कम्युनिटीला सवलत देण्याची मागणी केली. यावर व्यवस्थापक दास म्हणाले की, शासकीय दरापेक्षा कमी मूल्यांकन करु नये, असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. बँकांनी ग्राहकांसोबत मीटिंग करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश आहेत. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी प्रास्तविक केलेे.
...तर बँकेतील चालू खात्यावरही व्याज मिळेल
बँकेतील मुदत ठेवी जर बचत आणि चालू खात्याशी संलग्न केल्यास कमीत कमी रकमेपेक्षा जेवढी रक्कम खात्यात असेल, त्या रकमेवर व्याज बँकांकडून मिळू शकते, असे महाव्यवस्थापक बिस्वजित दास यांनी सांगितले. महिलांसाठी लखपती दीदी योजना असल्याचे त्यांनी नमूद केले.