ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

By विजय सरवदे | Published: December 15, 2023 06:23 PM2023-12-15T18:23:00+5:302023-12-15T18:23:36+5:30

आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी काढले ६१ हजार दाखले

Why go to Gram Panchayat? Get instant receipt on 'Maha e-Gram Citizen Connect' app | ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

छत्रपती संभाजीनगर : अनेक वेळा ग्रामपंचायत यंत्रणेच्या कार्यपद्धतीमुळे आवश्यक असणारे दाखले मिळवताना नागरिकांना अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी शासनाने आता ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप’ विकसित केले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीमार्फत दिला जाणारा दाखला काढता येणार आहे.

जिल्ह्यात नागरिकांनी आतापर्यंत तब्बल ६१ हजार दाखले या ॲपवरून डाऊनलोड केले आहेत. ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट ॲप’च्या माध्यमातून केवळ आवश्यक दाखलेच नाही, तर कराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उंबरे झिजवायची गरज नाही. आपणास कोठूनही कर भरणा करता येतो. जिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींनी नागरिकांना सेवा देण्यासाठी या ॲपची सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २५ हजार ६५८ नागरिकांनी हे ॲप डाउनलोड केले असून, आतापर्यंत ६१ हजार दाखले घरबसल्या काढले आहेत, हे विशेष! 

महा ई-ग्राम सिटिझन ॲप हे एक वेब-आधारित माहितीचे संकलन करून सदरील माहिती शासनाला उपयुक्त अशा सूचीबद्ध पद्धतीने सादर करण्यासाठी तयार केलेली प्रणाली आहे. ही प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या पंचायतराज संस्थांसाठी तयार केली आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर करून सूचीबद्ध पद्धतीने माहितीचे सादरीकरण ‘महा ई-ग्राम’ या प्रणालीद्वारे करण्यात येत आहे.

मोबाइलवर ॲप कसे इन्स्टॉल कराल?
मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर रजिस्ट्रेशन की वर क्लिक करावे. ओपन पेजवर नाव, वडिलांचे नाव, आडनाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी टाकावा. त्यानंतर लगेच ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर युजर आयडी आणि पासवर्ड येईल. याद्वारे या ॲपच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. कोणते दाखले मिळणार? या ॲपद्वारे जन्माचा दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, पाणीपट्टी, घरपट्टी, नमुना ८ दाखला एवढेच नव्हे, तर ग्रामपंचायतीला सूचनाही देता येतात आणि कराचा भरणाही करता येतो.

कोणत्या तालुक्यात किती ॲप डाउनलोड?
तालुका -             ॲप डाउनलोड

छत्रपती संभाजीनगर : ३०६५ फुलंब्री : २७७५ सिल्लोड : २९२१ सोयगाव : १०४४ कन्नड : ३७३६ खुलताबाद : ३२७३ गंगापूर : २६२० वैजापूर : २८६६ पैठण : ३३५८

वेळेची बचत करा
या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या दाखले मिळणार आहेत. याशिवाय कर भरणादेखील सोयीस्कर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेची बचत करण्यासाठी हे ॲप डाउनलोड करावे.
- डॉ. ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं. स. विभाग, जि. प.)

Web Title: Why go to Gram Panchayat? Get instant receipt on 'Maha e-Gram Citizen Connect' app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.