जबरदस्त! गोव्याला कशाला? गोदावरी नदीत आता घेता येणार क्रूझ पर्यटनाचा आनंद

By संतोष हिरेमठ | Published: July 22, 2024 02:19 PM2024-07-22T14:19:33+5:302024-07-22T14:20:50+5:30

परवडणारे क्रूझ पर्यटन करणार विकसित : पर्यटकांना मिळणार आगळावेगळा अनुभव

Why Goa? Cruise tourism can now be enjoyed in the Godavari river | जबरदस्त! गोव्याला कशाला? गोदावरी नदीत आता घेता येणार क्रूझ पर्यटनाचा आनंद

जबरदस्त! गोव्याला कशाला? गोदावरी नदीत आता घेता येणार क्रूझ पर्यटनाचा आनंद

छत्रपती संभाजीनगर : क्रूझ म्हटले की लगेच सर्वांच्या नजरेसमोर गोवाच येतो. गोवा हे सुंदर समुद्रकिनारे, समुद्री खाद्यपदार्थ, नाइटलाइफ आणि क्रूझ पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात समुद्रात मोठमोठ्या जहाजातून प्रवास करणे हा पर्यटकांसाठी एक आनंददायी अनुभव असतो. याच क्रूझ पर्यटनाचा आनंद आता आगामी काही दिवसांत गोदावरी नदीत घेता येणार आहे. तेही अगदी परवडणाऱ्या दरात.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन धोरण २०२४ तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील सागरी किनारपट्टीचा पर्यटनासाठी वापर करण्यात येणार असून, क्रूझ पर्यटन निर्माण करण्याचे धोरणही त्यात समाविष्ट आहे. मात्र, केवळ समुद्र किनारेच नाहीत, तर यात राज्यातील काही नद्यांवरही क्रूझ पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. यात गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. परवडणारे क्रूझ पर्यटन विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

क्रूझ पर्यटन म्हणजे काय?
क्रूझ पर्यटन म्हणजे मोठ्या बोटीतून, म्हणजेच क्रूझ जहाजातून प्रवास करणे. हा प्रवास मनोरंजन, विश्रांती आणि विविध स्थळांची सफर करण्यासाठी केला जातो. क्रूझ जहाजांवर विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध असतात. जसे की स्विमिंग पूल, थिएटर, कॅसिनो, जिम, स्पा, आणि लाइव्ह शो. प्रवाशांसाठी विविध खेळ, कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. क्रूझ पर्यटनासाठी विविध प्रकारचे क्रूझ जहाजे आणि पॅकेजेस उपलब्ध असतात. प्रवाशांना आपल्या आवडीप्रमाणे आणि बजेटप्रमाणे योग्य पॅकेज निवडावे लागते. गोवा, मुंबईत अशा प्रकारचे क्रूझ जहाजे अधिक पाहायला मिळतात.

अशी वाहते गोदावरी...
गोदावरी नदी राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर येथून उगवते. ती दख्खन पठार ओलांडून पश्चिमेकडून पूर्व घाटापर्यंत वाहते. गोदावरी नदीची लांबी १ हजार ४६५ कि.मी. आहे. त्याचा मुख्य प्रवाह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहतो आणि शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतो.

Web Title: Why Goa? Cruise tourism can now be enjoyed in the Godavari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.