पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलून, स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात का घालतोय दादा ?
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 4, 2024 19:55 IST2024-01-04T19:55:03+5:302024-01-04T19:55:50+5:30
पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलणे हे धोकादायक आहे, हे माहीत असतानाही मोबाइलवर बोलताना तरुण.

पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलून, स्वत:सोबतच इतरांचाही जीव धोक्यात का घालतोय दादा ?
छत्रपती संभाजीनगर : ‘पेट्रोलपंपावर मोबाइलवर बोलण्याचा अट्टाहास नडला, बाइक पेटली’, ‘बाइकमध्ये पेट्रोल भरताना बायकोचा फोन आला अन् टाकीने पेट घेतला!’ अशा मथळ्याच्या बातम्या आपण अधूनमधून वर्तमानपत्रात वाचत असतो. पंपावर मोबाइलवर बोलणे घातक आहे, हे माहीत असतानाही अनेक बाइकस्वार त्याकडे दुर्लक्ष करतात. मोबाइलवर बोलू नये, असे स्टिकर पंपावर लावलेले असते. मात्र, त्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शहरातील पेट्रोलपंपावर फेरफटका मारला असता पंपासमोर सर्रास मोबाइलवर बोलणारे दिसून आले. त्यांना कोणी हटकतही नव्हते, हे विशेष.
पंपाच्या परिसरात मोबाइलवर का बोलू नये ?
१) पेट्रोलपंप परिसरात मोबाइलवर बोलणे टाळावे.
२) मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आग लागण्याची शक्यता असते.
३) प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल घेऊन जाणे धोकादायक असते.
पेट्रोलपंपचालक काय म्हणतात ?
१) पंपावर मोबाइलवर बोलू नये, असे स्टिकर लावण्यात आले आहे. तरी वाहनधारक त्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात.
२) कर्मचाऱ्यांनी वाहनधारकाला मोबाइलवर बोलण्यास मज्जाव केला तर वाहनधारक हमरीतुमरीवर येतात.
३) ऑनलाइन पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी वाहनधारकांना खिशातून मोबाइल काढावा लागतो.