का म्हणतात, ‘पुअर मॅन्स ताज?’ हे तर आमचे वैभव; ‘दख्खन का ताज’ चा चुकीचा प्रचार नको
By संतोष हिरेमठ | Published: February 8, 2024 05:08 PM2024-02-08T17:08:17+5:302024-02-08T17:11:52+5:30
‘ताजमहाल’पेक्षा कितीतरी कमी खर्चात साकारला बीबी का मकबरा
छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खन का ताज’, ‘मिनी ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध बीबी का मकबऱ्याला ‘पुअर मॅन्स ताज’ही म्हटले जात आहे. असे का? तर ‘ताजमहाल’पेक्षा कितीतरी कमी खर्चात ‘बीबी का मकबरा’ साकारण्यात आला. मात्र, ‘गरिबांचा ताज’ असा प्रचार होत आहे; पण अशा प्रकारचा प्रचार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ताजमहालप्रमाणे पर्यटन नगरी छत्रपती संभाजीनगरातील ‘बीबी का मकबरा’देखील जगभरातील पर्यटकांना खुणावतो. या ठिकाणी दररोज हजारो देश-विदेशांतील पर्यटक भेट देतात. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूलही शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. या सगळ्यांत अनेक ठिकाणी बीबी का मकबऱ्याविषयी माहिती देताना ‘पुअर मॅन्स ताज’ असा उल्लेख केला जात आहे.
‘पुअर मॅन्स ताज’ असा उल्लेख नको
बीबी का मकबऱ्यास ‘पुअर मॅन्स ताज’ असे म्हणता कामा नये. ‘ताज ऑफ डेक्कन’, ‘ ताज महाल रिप्लिका’, ‘दख्खनचा ताज’ म्हणावे. ताजमहाल आणि बीबी का मकबरा यांत साधर्म्य खूप कमी आहे. शंख घासून तयार केलेली पावडर, दूध, चुनखडी, पांढऱ्या दगडाचा चुरा यांचा वापर करून बीबी का मकबरा साकारण्यात आला आहे.
- उमेश जाधव, सचिव, टुरिस्ट गाइड्स वेल्फेअर असोसिएशन
उभारणीत किती आला खर्च
- ताजमहाल साकारण्यासाठी त्या काळी किती खर्च - सुमारे ३ कोटी २० लाख रुपये
- बीबी का मकबरा साकारण्यासाठी त्या काळी किती खर्च - सुमारे ६ लाख ६५ हजार २६१ रुपये ७ पैसे.
किती पर्यटकांची भेट, किती महसूल मिळाला?
कालावधी - भारतीय पर्यटक - महसूल - परदेशी पर्यटक - महसूल
२०२२ ते २३ - ११,६१,८०२- ५३ लाख ४५ हजार ९० रुपये.-४,७१४- १३ लाख ९० हजार १०० रुपये.