अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाया का नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:44 PM2024-08-12T19:44:29+5:302024-08-12T19:44:53+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांच्या भागात कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले होते.

Why is there no action on illegal mineral mining? Notice from District Collector to Tehsildar | अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाया का नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना नोटीस

अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाया का नाहीत? जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना नोटीस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिजचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाया का होत नाहीत, असा सवाल उपस्थित करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमवारपर्यंत खुलासा करावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वाळू, मुरूम, खदानीतून अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. नदीपात्रांची चाळणी होत असून डोंगर भुईसपाट होत आहेत. अवैध स्टोन क्रशरमुळे डोंगररांगा नष्ट होण्याची भीती आहे. 

प्रशासनाने तहसील पातळीवर वारंवार कारवाईचे आदेश दिले. त्यासाठी तहसीलदारांना शस्त्रधारी सुरक्षा रक्षकही दिले. तरीही कारवाया होत नसल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. तहसीलदारांसह स्थानिक पातळीवरील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई फिरते आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आणि जिल्हा गौणखजिन अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागली. १ एप्रिलपासून आजपर्यंत १९ वाहने पकडली. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना या प्रकरणात कानपिचक्या दिल्या. ‘लोकमत’ने ३० जुलै रोजीच्या अंकात ‘वाळू माफियांचा धुमाकुळ, जिल्ह्यातील नद्यांची चाळणी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या महसूल यंत्रणेला फैलावर घेत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले
जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांच्या भागात कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले होते. कुठेही अवैध स्टोन क्रेशर सुरू नसल्याचा दावाही केला. परंतु, त्या बैठकीनंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चितेगाव परिसरात कारवाईत पाच अवैध स्टोन क्रशर सील केले, तर सावंगी परिसरात तब्बल ८ स्टोन क्रशर चालकांवर गुन्हा दाखल केला. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कावसान येथे अवैध वाळू उत्खनन करणारी सात वाहने पकडली.

तीन महिन्यांत फक्त ७८ कारवाया
जिल्ह्यातील ९ तालुके, छत्रपती संभाजीनगर अपर तहसीलसह १० कार्यालयाने तीन महिन्यांत केवळ ७८ कारवाया केल्या आहेत. एक कोटी ५५ लाख ६१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी केवळ ७६ लाख ३९ हजार वसूल केले. पाचजणांवर गुन्हा दाखल केला. वैजापूर येथे दोघांना अटक केली. ७८ वाहने आणि १ यंत्र जप्त केले.

तहसीलनिहाय कारवाया अशा...
गंगापूर ...६
वैजापूर...९
वैजापूर...१५
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण...१३
छत्रपती संभाजीनगर शहर...६
उ.वि.अ. छत्रपती संभाजीनगर...१९
खुलताबाद...३
कन्नड...१२
उ.वि.अ. कन्नड...१५
सिल्लोड...३
सोयगाव...००
उ.वि.अ. सिल्लोड..३
फुलंब्री...४
पैठण...२२
उ.वि.अ. पैठण..२६
एकूण.......७८

Web Title: Why is there no action on illegal mineral mining? Notice from District Collector to Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.