बस का भावा! कारच नाही, टायरसाठीही घे कर्ज! एकदम पैसे देण्याचे टाळण्यासाठी चालकांचीही पसंती
By संतोष हिरेमठ | Published: January 31, 2024 09:21 AM2024-01-31T09:21:19+5:302024-01-31T09:22:23+5:30
आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते. वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.
- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : आजकाल अनेक कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. कर्ज घेतले की दुचाकी, चारचाकी वाहन दारात येते. वाहन घेण्यासाठीच नव्हेतर, आता फक्त टायर घेण्यासाठीही कर्ज दिले जाते आहे.
पूर्वी कर्ज घ्यायचे म्हटले की, अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कर्ज मिळेलच, याची शाश्वती नसे. मात्र, गेल्या काही वर्षांत कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे. घर, वाहन अगदी मोबाइल घेण्यासाठीही कर्जाची सुविधा अनेक कंपन्यांकडून दिली जात आहे. त्यातच आता वाहनासाठी नवे टायर घ्यायचे असतील तरीही कर्जाची सुविधा अनेक मोठ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिली आहे. अनेक टायर विक्रेत्यांकडे मोठमोठ्या फलकांवर ‘लोन पे टायर..’ लिहिलेले पाहायला मिळत आहे.
किती आहेत किमती ?
- दुचाकी - १,५०० ते २,००० रुपये
- तीन, चारचाकी - २,५०० ते ३,००० रुपये
- चारचाकी - ३,००० ते १०,००० रुपये
अनेक जण कर्जावर टायर घेतात. चार ते पाच महिन्यांत हप्ते संपतात. महिन्याला १० जण तरी कर्जावर टायर घेतात.
- अमरदीप सिंंग, व्यावसायिक
सुलभ परतफेड
कर्जावर टायर खरेदी केल्यानंतर ग्राहकाला सुलभ हप्त्यांत परतफेड करण्याची सोय आहे. त्यामुळे एकाच वेळी पैसे देण्याची वेळ टळते.
कधी बदलावेत?
- सरासरी ३० हजार ते ५० हजार कि.मी.नंतर वाहनाचे टायर बदलावेत.
- टायरमध्ये दिलेल्या इंडिकेटरद्वारे अचूक वेळदेखील शोधता येते.
- जेव्हा रस्त्याच्या संपर्कात असलेला भाग संपतो तेव्हा टायर बदलण्याची वेळ आल्याचे समजावे.
- टायर जीर्ण झाला असेल तर अशा परिस्थितीत टायर बदलावेत.
- टायरमध्ये अर्धा सेंटिमीटरपेक्षा जास्त छिद्र असेल तर टायर बदलावेत.