भाजपबरोबर जाता मग कम्युनिस्टांबरोबर का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:49 PM2019-03-04T22:49:28+5:302019-03-04T22:53:03+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल. अर्थात मार्क्सवाद्यांनी जातव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहेच. त्यांच्या लाख चुका असल्या तरी वर्गसंघर्षातलं त्यांचं सातत्य कुणीही नाकारू शकत नाही. राजकारणात तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता मग कम्युनिस्ट का चालत नाहीत? असा खडा सवाल आज येथे औरंगाबादचे माजी पोलीस आयुक्त उद्धव कांबळे यांनी उपस्थित केला.
‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन आणि दिशा’ या आपल्या ग्रंथावरील परिसंवादात प्रा. राहुल कोसंबी व प्रा. उमेश बगाडे यांच्या मांडणीनंतर उद्धव कांबळे हे आपली बाजू मांडत होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनीत झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉ. भगवानराव देशपांडे होते. प्रगतिशील लेखक संघ व लोकवाङ्मयाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रकाशक या नात्याने कॉ. भालचंद्र कांगो यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. ‘जयभीम - लाल सलाम’हा नारा अपघात नव्हे तर तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. टीका झाल्याशिवाय क्रांतीचा रथ पुढे जाणार नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा विचार करूनच पुढे जावयाचे आहे, असे ते म्हणाले.
जातीची अट हा मोठा अडथळा...
उद्धव कांबळे यांनी सांगितले की, वर्ग भान निर्माण करण्यात जातीची अट हा मोठा अडथळा होय, असा अडथळा म्हणजे सवतासुभा व वेगळी ओळख निर्माण करण्याचे राजकारण होय. नुसती राज्यघटना असून चालत नाही, तर तिला संस्थात्मक निर्मितीचं पाठबळ द्यावं लागतं.
१८५६ सालानंतरच्या कायद्यांमध्ये काहीही बदल झाला नाही. नोकरशाही व न्याय व्यवस्थेतसुद्धा काही बदल झालेले नाहीत. आज जगभर एक भीषण संकट उभे राहत आहे, ते हिटलरशाहीचं. हे आव्हान वेळीच पेलवलं जाण्याची गरजही कांबळे यांनी प्रतिपादिली. फाळणीच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना तयार झाली. काही मुद्यांवर राज्यघटनेनेही सायलेन्सेस पाळलेली दिसून येते. ते मुद्देही त्यांनी मांडले.
कॉ. प्रकाश बनसोड, सुनील उबाळे, धम्मपाल जाधव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चळवळीतील कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.