क्यों न कहें हम, इससे तो अच्छे पुराने दिन ही थे
By Admin | Published: July 9, 2014 12:35 AM2014-07-09T00:35:18+5:302014-07-09T00:52:43+5:30
औरंगाबाद : रेल्वे अर्थसंकल्पातून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्याचे औरंगाबादकरांना वाटत आहे.
औरंगाबाद : प्रवासी वाहतुकीत कोणताच दिलासा न देणारा तसेच मालवाहतुकीच्या दरात वाढ करणारे रेल्वे बजेट असल्याने येत्या काही दिवसांत महागाई आणखीन वाढेल, अशा प्रतिक्रिया आज शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. रेल्वे अर्थसंकल्पातून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्याचे औरंगाबादकरांना वाटत आहे.
महागाईत वाढ
मालवाहतूक दरात काही दिवसांपूर्वीच वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वेतून येणारे खत, अन्नधान्यासह इतर साहित्याच्या किमतीत वाढ होईल. यातून महागाई वाढेल.
- मोहंमद अस्लम मोतीवाला, अध्यक्ष, हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन अँड हुंडेकर असोसिएशन
सुविधेत वाढ व्हावी
मालवाहतुकीत ४.९ टक्के वाढीचे उद्दिष्ट आहे; परंतु आधी सुविधा मिळाल्या पाहिजेत. रेल्वे अधिकाऱ्यांना अधिकारशाहीची भूमिका बदलावी लागेल तरच मालवाहतुकीत वाढ होऊ शकते.
- फय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन
सुरक्षितता महत्त्वाची
रेल्वेचा प्रवास बसच्या तुलनेत स्वस्त आणि सोयीचा ठरतो. सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू केली जाईल, आरपीएफमध्ये भरती होणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी.
- छाया पिंपळे, गृहिणी
सुविधा मिळत नाहीत
अर्थसंकल्पात केवळ घोषणा करून चालणार नाही, तर त्या प्रत्यक्षात सुविधा मिळाव्यात.
- सचिन जगताप, प्रवासी
बोगींमध्ये वाढ व्हावी
विमानतळासारख्या सुविधा देणार असल्याचे जाहीर झाले; परंतु प्राधान्याने स्थानक आणि रेल्वेगाडीतील स्वच्छतेवर भर दिला जावा. तसेच विविध रेल्वेगाड्यांच्या बोगींमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे.
- प्रसाद माने, प्रवासी
दरवाढ कमी व्हावी
दरवाढ कमी होण्याची आशा होती. अधिक पैसे मोजूनही सुविधा मिळत नाहीत. बोगींची संख्या वाढविली पाहिजे.
- के.के. यादव, प्रवासी
खाजगीकरणाने मनमानी
रेल्वेत खासगीकरणाचा प्रवेश होता कामा नये. असे झाल्यास प्रत्येक सेवेचे दर वाढतील. मनमानी वाढू शकते.
- जी.आर. कुलकर्णी, प्रवासी
व्यापारी दृष्टिकोन ठेवून अर्थसंकल्प
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यापारी दृष्टिकोन ठेवून रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे, याचे मी स्वागत करतो. जसजसे डिझेलचे भाव वाढतील तसतसे रेल्वेचे प्रवासभाडे वाढेल, अशी घोषणा केल्याने आता रेल्वेची तूट कमी होणार आहे.
-अजय शहा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
रेल्वेच्या विकासासाठी चांगला प्रयत्न
सर्व रेल्वेस्थानकांवर पीपीपीच्या माध्यमातून पूल, लिफ्ट व एस्केलेटर बनविण्यात येणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे रेल्वेस्थानकांचा विकास होईल. सुविधांमध्ये वाढ होईल. मुंबई- अहमदाबाद मार्गावर पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.
-सुनील काला, करसल्लागार
‘लोकमत’च्या प्रयत्नांना यश
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद- चाळीसगावदरम्यान समांतर रेल्वेमार्ग सुरू करण्यात यावा, या प्रश्नाला सर्वप्रथम ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. औरंगाबाद- चाळीसगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे.
-अजय तलरेजा, व्यापारी
देशी पर्यटकांची संख्या वाढेल
नांदेड- बिकानेर रेल्वे सुरू केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा औरंगाबादला होणार आहे. कारण, या पर्यटनाच्या राजधानीत, सर्वाधिक पर्यटक राजस्थानमार्गेच येत असतात. विशेषत: देशी पर्यटक आता या रेल्वेने थेट औरंगाबादेत येतील, पर्यटकांची संख्या वाढेल.
-जसवंतसिंग, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स असोसिएशन
पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे
बुलेट ट्रेन सुरू करण्यापूर्वी केंद्र सरकारने रेल्वेस्टेशनवर देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे. कारण, नुकतेच औरंगाबादेत पावसाने सिमेंटच्या बॅगांचे नुकसान झाले. रेल्वेस्टेशनवर गोदामाची सुविधा नाही. माल उचलण्याची सुविधा नाही.
-मनोज रुणवाल, सिमेंटचे वितरक
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हाताळला
रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षतेसाठी ४ हजार महिला कॉन्स्टेबलची भरती करण्यात येणार आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी केंद्र सरकार किती गंभीर आहे याची प्रचीती येते. औरंगाबाद- अहमदाबाद रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे; पण ती पूर्ण झाली नाही.
-लालाभाई पारीख, सचिव, औरंगाबाद कुरिअर असोसिएशन