दंड कशाला भरता; सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार
By साहेबराव हिवराळे | Published: September 27, 2023 05:33 PM2023-09-27T17:33:36+5:302023-09-27T17:33:46+5:30
ग्राहकांना ऑनलाईनचा पर्यायही आहे..
छत्रपती संभाजीनगर : अनंत चतुर्थी ते सोमवार अशी पाच दिवस सुटी असल्याने वीजबिल कसे भरायची चिंता सतावते आहे का? तर दंड भरण्याची किंवा कनेक्शन कट होण्याची भिती बाळगू नका. दि. २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत बील भरणा केंद्र महावितरण सुरू ठेवणार आहे.
महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातील सर्व घरगुती, व्यापारी व औघोगिक व इतर वीज ग्राहकांकडून चालू व थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणची मोहीम जोरदार राबविण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी गुरूवार ते सोमवार या सुटीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार आहे. ग्राहकांना वीज बिल भरणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय ग्राहकांच्या आग्रहास्तव घेतला आहे.
ग्राहकांना ऑनलाईनचा पर्यायही आहे..
वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशी घरबसल्या महावितरणच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन बिल भरण्याचा पर्याय पण आहे. वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांनी केले आहे.