पेन्शनचे टेन्शन कशाला?; पोस्टातून मिळेल महिन्याला उत्पन्न
By साहेबराव हिवराळे | Published: March 21, 2024 06:36 PM2024-03-21T18:36:28+5:302024-03-21T18:36:49+5:30
पोस्टाची मासिक उत्पन्न बचत योजना ठरतेय लाभदायी; गुंतवणूकही वाढली
छत्रपती संभाजीनगर : पोस्टाची गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटू लागल्याने बँकांप्रमाणेच पोस्टात खाते उघडून गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पोस्टाने पती-पत्नीसाठी सुरू केलेली मासिक उत्पन्न बचत योजनादेखील लाभदायी ठरली असून, या योजनेतील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे.
टपाल कार्यालयाकडून सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ बचत खाते, महिला सन्मान बचतपत्र योजना, अपघाती विमा योजना, मासिक उत्पन्न बचत अशा अनेक योजना राबविल्या जातात. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे मासिक उत्पन्न बचत खाते. या योजनेंतर्गत पती-पत्नीला पोस्टात वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडून एकरकमी गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर त्यांना दरमहा अथवा वार्षिक उत्पन्न मिळू शकते.
वैयक्तिक : मासिक उत्पन्न योजनेत पती अथवा पत्नीला वैयक्तिक खाते उघडता येते. या खात्यात गुंतवणुकीची मर्यादा ९ लाख रुपये आहे.
किती वर्षांसाठी गुंतवणूक
वैयक्त्तिक व संयुक्त खात्यात गुंतवणुकीची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. पाच वर्षांसाठीच या खात्यात गुंतवणूक करता येते.
संयुक्त : पती-पत्नी अथवा अधिकाधिक तीन व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात. यात १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.
काय आहे पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक सरकारी बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास नियमित मासिक उत्पन्न मिळते. एका खात्यात अधिकाधिक ९ लाख रुपये तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
दोन प्रकारची खाती
किती गुंतवणूक केली तर किती मिळतात?
- वैयक्तिक खात्यात ९ लाख रुपये भरता येतात. या रकमेवर वार्षिक ७.४ टक्के इतके व्याज दिले जाते. पाच वर्षांनंतर या गुंतवणुकीवर मासिक ५५०० तर वर्षाला ६६ हजार रुपये व्याज मिळते.
- संयुक्त खात्यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा १५ लाख रुपये आहे. पाच वर्षांनंतर गुंतवणुकीवर मासिक ९२५० तर वर्षाला १ लाख ११ हजार रुपये व्याज मिळते. ही योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर आहे.
नागरिकांचा कल वाढू लागला
पोस्ट ऑफिसकडून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मासिक उत्पन्न बचत योजना त्यापैकीच एक. या योजनेंतर्गत वैयक्तिक व संयुक्त खाते उघडता येऊ शकते. एकरकमी गुंतवणुकीवर महिन्याला उत्पन्न मिळत असल्याने या योजनेत खाते उघडून गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे.
- जी. हरि प्रसाद, प्रवर डाक अधीक्षक