'फुले-शाहू-आंबेडकर' आदर्श का ? प्रबोधनकार ठाकरे वाचा, असे प्रश्न पडणार नाहीत: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:08 PM2022-04-26T18:08:30+5:302022-04-26T18:09:39+5:30
या देशात अनेकांची राज्य झाले, पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य नव्हते ते रयतेचं राज्य होत.
औरंगाबाद: शरद पवार हे फुले शाहू आंबेडकर याचंच नाव का घेतात असं विचारतात. महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या, प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनावरील विचार जर वाचले तर असा प्रश्न कोणी विचारणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला. ते मुप्टा संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, ते फक्त फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतात असे वक्तव्य केले होते. याचा समाचार आज पवार यांनी घेतला. फुले-शाहू -आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान नमूद करताना पवार यांनी अनेक महत्वपूर्ण दाखले दिली. तसेच शिवाजी महाराजांना रयतेचे राजे का म्हणत यावर ते म्हणाले, ज्यावेळी संपूर्ण समाज अस्वस्थ होता त्यावेळी या समाजाचे सत्व जागं करण्याचं काम करून शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं. या देशात अनेकांची राज्य झाले, पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य नव्हते ते रयतेचं राज्य होत. समाजातील उपेक्षित घटकांचे राज्य होते, असे गौरवद्गार शरद पवार यांनी काढले. पुढे महात्मा फुले यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, इंग्लडचा राजा भारतात आला तेंव्हा महात्मा फुले शेतकऱ्यांचा वेशात भेटायला गेले, त्यावेळी राज्यात दुष्काळ होता आणि त्यांनी पाझर तलाव निर्माण करण्याची मागणी केली, शेतीला जोडधंदा हवा, यासाठी गाई समृद्ध झाल्या पाहिजे त्यासाठी गाईंची नवीन जात आणा अशी मागणी केली. तज्ज्ञांच्या मदतीने शेतीचं उत्पादन वाढवा यासाठी संकरित वाण आणावं अशी मागणी केली म्हणून फुल्यांचं नाव घेतो. फुल्यांनी आणि सावित्रीबाई यांनी सर्वसंन्याना शिकवलं आज फुले असतील नसतील पण त्याचं योगदान संपणार नाही.
यासोबतच राजर्षी शाहू महाराजांवर बोलताना पवार म्हणाले, शाहू महाराज शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवण करायचे त्यांच्या समस्या ऐकायचे. शाहू महाराजांना खोटं बोललेलं आवडायचं नाही, त्यांचा कष्टावर विश्वास अधिक होता यावर काही सरदार शाहूंना भेटले आणि कर्नाटकातून ज्योतिष येणार आहे, तेंव्हा शाहू म्हणाले माझा कष्टावर विश्वास आहे, यांच्यावर विश्वास नाही, भेटणार नाही, पण आग्रहावरून शाहू भेटले, त्यावेळी ज्योतिष रडायला लागले, म्हणाला तुमच्या पोलिसांनी मला पकडलं मारलं दोन दिवस जेवायला दिलं नाही त्यावर शाहू महाराज म्हणाले तू ज्योतिष आहेस मग तुला हे चार दिवस आधी कळलं नाही का.?
तिसरे नाव घेतो ते बाबासाहेब आंबेडकर यांचे, त्यांना मानायचे कारण, सध्या आपल्या आसपास आणि इतरत्र अनेक देश अस्वस्थ आहेत. तिथली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे. पण आपल्या देशात अनेक आंदोलन झाले पण आपला देश आजही अबाधित आहे. याचे कारण संविधान आहे. हे बाबासाहेबांचे योगदान आहे. बाबासाहेबांचे देशासाठी भरीव योगदान आहे. स्वतंत्र मिळायच्या पूर्वी एक सरकार बनले यात बाबासाहेब यांच्यासह अनेक नेते होते. त्यावेळी बाबासाहेब यांच्याकडून जलसंधारण, कामगार, वीज हे खातं त्यांच्याकडे होतं. स्वातंत्र्याधी धरणं बांधण्याचं निर्णय बाबासाहेबानी घेतला. देशातील सर्वात मोठे धरण भाकरा नांगल प्रकल्प उभारण्याचा निर्णय बाबासाहेब यांनी घेतला. त्यामुळे त्या भागात आज 90 टक्के सिंचन आहे. दामोदर व्हॅली हा प्रकल्प बाबासाहेब यांनी मंजूर केला. आज वीज संकट आहे, बाबासाहेब यांनी निर्णय घेतला एखाद्या राज्यात जास्त वीज आणि एखादा राज्यात कमी वीज असेल तर ती वीज या राज्यातून त्या राज्यात नेण्यासाठी पॉवरग्रीड योजना ही बाबासाहेब यांनी आणली. ही व्यवस्था बाबासाहेबांनी केलेली आहे. असे दृष्टे नेते फुले-शाहू-आंबेडकर होते. त्यामुळे मी फुले शाहू आंबेडकर यांना आदर्श मानतो, असेही बाबासाहेबांनी स्पष्ट केले.