खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:46 IST2025-04-07T16:44:37+5:302025-04-07T16:46:19+5:30
खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला...

खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं!
खुलताबादचे नाव पुन्हा रत्नपूर करावे, अशी मागणी शिवसेना नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. मुळात हे नामांतर नाही, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला.
यासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "खुलताबादचे नाव पूर्वी रत्नपूर होते. हे रेकॉर्डवर आहे. इंग्रजांनी येथे जी सत्ता उपभोगली, ते जे शेतसारा वसूल करायचे त्यातही रत्नपूर असेच लिहिलेले आहे. म्हणून आम्ही काही नवीन मागतोय अशातला भाग नाही." तसेच, "दौलताबाद हे दौलताबाद नाही तर देवगिरी आहे. त्याला देवगिरी प्रांत म्हटलं जात होतं आणि राजा रामदेवरायांचे तेथे राज्य होते. आता दौलताबाद किल्ला काही औरंगजेबाने बांधला आहे का? नाही. ती असलेली वास्तू, तेथे राज्य केले आहे. शिरसाट एबीपी माझासोबत बोलत होते.
...मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको? -
शिरसाट पुढे म्हणाले, "आपण हे जे नामांतर म्हणतो ना, तर हे नामांतर नाहीय, तर झालेली चूर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याचे कारण एक आहे, आम्ही जी औरंगजेबाची कबर खोदण्याचा विषय काढला, त्याचा काही लोकांना त्रास झाला. मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आपण आपला स्वाभिमान जागृत करायला नको?
जसे संभाजीनगर झाले, तसेच... -
"यासंदर्भात मी मुख्यमंत्रीसाहेबांना पत्र देतोय आणि टेक्निकल प्रोसेस जी आहे की, याला विधानसभेत, हाऊसमध्ये मान्यता घ्यावी लागेल. यानंतर ते केंद्राकडे पाठवावे लागेल. केंद्राच्या मान्यतेनुसारच हे नाव बदलले जाईल. जसे, धाराशीव झाले, अहमदनगरचे अहिल्यानगर झाले. संभाजीनगर झाले. त्याच पद्दतीने हेही आपल्याला केंद्राच्या गॅझेटमध्ये आणावे लागेल. यानंतरच तेही बदलले जाईल.