तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? महायुती-आघाडीत घटक पक्षांची प्रचारात सक्रियता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:38 PM2024-11-07T18:38:54+5:302024-11-07T18:41:50+5:30
ज्या पक्षाचा उमेदवार, त्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसते.
बीड : जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला जास्त जागा आहेत. भाजपला दोन आणि ठाकरे गटाला एकमेव जागा आहे. त्यामुळे युती आणि आघाडीतील मित्र आणि घटक पक्ष अजूनतरी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले नाहीत. ज्या पक्षाचा उमेदवार, त्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसते. मैत्री असली तरी तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? असा सवाल इतर पक्षाचे पदाधिकारी करत आहेत.
जिल्ह्यात परळी, बीड, आष्टी, केज, गेवराई आणि माजलगाव असे सहा मतदारसंघ आहेत. महायुतीत आष्टी आणि केज मतदारसंघात भाजपला तर इतर पाच ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. आघाडीत केवळ गेवराईला अजित पवार गटाची जागा असून पाच ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. सध्या तरी जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचेच उमेदवार जास्त असल्याचे दिसत आहे. परंतु युतीतील अजित पवार गटासोबत असलेली शिंदेसेना आणि भाजप हे बीड, गेवराई, माजलगाव, परळी मतदारसंघात फारशी सक्रिय असल्याचे दिसत नाही. तर भाजपचे उमेदवार असलेल्या ठिकाणी इतर पक्ष सक्रिय नाहीत. आघाडीतही अशीच अवस्था आहे. गेवराईत ठाकरे गटाचा उमेदवार असल्याने शरद पवार गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी सक्रीय झालेले नाहीत. यावरून युती, आघाडी असली तरी इतर पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अद्यापही मानपान दिला जात नसल्याने हे लोक प्रचारापासून दूरच असल्याचे दिसत आहे. युती आणि आघाडीतील काही मोजके पदाधिकारी मात्र पहिल्या दिवसापासून सक्रिय आहेत.
भाजप, काँग्रेसमध्ये नवे जिल्हाध्यक्ष
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजपचे राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली. आता त्यांच्या जागी शंकर देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी राहुल सोनवणे यांची नियुक्ती केली आहे. मस्के आणि देशमुख या दोघांनीही शरद पवार गटात प्रवेश केला.