गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:02 AM2021-07-18T04:02:12+5:302021-07-18T04:02:12+5:30
साहेबराव हिवराळे औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण ...
साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही बस जात नाहीत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची खाजगी वाहनाने शहरात येण्यासाठी धावपळ सुरू असते.
ग्रामीण भागातील आठ तालुक्यांत ५६ बस आहेत. जेमतेम २३ बस सोडण्यात आलेल्या असून, आवश्यकतेनुसारच इतर बस सोडण्यात येणार आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. शहर, ग्रामीण लॉकडाऊन झाल्यामुळे गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच धावते, ग्रामीण भागावर चांगले आहे का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. खेड्यांत कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. शाळादेखील सुरू होण्याच्या मार्गावर असून, बहुतांश शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी बसची आवश्यकता आहे. या मुलांना बसशिवाय शाळेत ये-जा करणे शक्य नाही. त्या बस सुरू झाल्या, तर शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा होईल.
आगारातील एकूण बस - ५००
कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १,०००
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ७००
खेडेगावांत जाण्यासाठी ‘टमटम’चा आधार...
-खेड्यातील नागरिकांना बससेवा कमी असल्यामुळे खाजगी वाहनाने, टमटम, कालीपिली, रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहनाने प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो; परंतु नाइलाजाने त्या टमटमचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.
सहा हजार कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहरांचाच!
दुसरी लाट ओसरल्यानंतर आगारातील सध्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास बस सुरू झाल्या असून, लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. शहरालगतच्या आठही तालुक्यांत २३ बस धावत असून, उत्पन्न सध्या जेमतेम होत आहे. प्रवासी अद्यापही म्हणावे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघताना दिसत नाहीत.
खेडेगावांवरच अन्याय का?
-प्रत्येक जण खेड्याला दुय्यम लेखतो, गावातील प्रवाशांना नाइलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाव तिथे एसटी फक्त नावापुरतेच राहिले आहे, असे म्हणावे लागेल.
-सांडू शेळके पाटील (प्रवाशाची प्रतिक्रिया)
-शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा हवा...
कोरोनामुळे एसटी बस बंद करण्यात आल्या असून, दुसऱ्या लाटेनंतर अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही.
-संजय जाधव (प्रवासी प्रतिक्रिया)
आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येईल...
सध्या जवळपास सर्वच बस सुरू करण्यात आल्या असून, संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरळीत करण्यात येईल. शाळा सुरू झाल्यामुळे बसदेखील प्रतिसादानुसार सुरू कराव्या लागणार आहेत.
-अमोल आहिरे, आगार नियंत्रक