कशाला औरंगाबादेत जन्म घेतला...!
By Admin | Published: August 6, 2016 12:10 AM2016-08-06T00:10:35+5:302016-08-06T00:12:31+5:30
मुजीब देवणीकर, औरंगाबाद मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत.
मुजीब देवणीकर, औरंगाबाद
शहरातील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी मूलभूत सोयी-सुविधांमुळे आधीच औरंगाबादकर प्रचंड वैतागलेले असतानाच महापालिकेकडून नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी अक्षरश: मरणयातनाच देण्यात येत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयात सकाळ, संध्याकाळ चकरा मारून जाम वैतागलेल्या नागरिकांचा संताप ‘कशाला औरंगाबादेत जन्म घेतला’ अशा शब्दांत उफाळून येत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला स्वत:च्या जन्म प्रमाणपत्राची फक्त साक्षांकित प्रत मिळविण्यासाठी चक्क दोन महिन्यांपासून वॉर्ड कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतीच सुटसुटीत पद्धत नाही. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात प्रमाणपत्र देण्यासाठी संगणकावर चक्कचौथी किंवा पाचवी उत्तीर्ण असलेल्या सफाई मजुरांना बसविण्यात आले आहे. त्यांना इंग्रजी तर सोडा व्यवस्थित मराठीही लिहिता, वाचता येत नाही. सहा वॉर्ड कार्यालयांमधून दररोज १०० ते १२५ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येतात. यामध्ये ८० टक्के प्रमाणपत्रांमध्ये चुकाच चुका असतात. एकदा देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ज्या नागरिकांनी वॉर्ड कार्यालयातील ‘दलाल’ अथवा कर्मचाऱ्यांच्या हातात ठराविक रक्कम ठेवली तर दुसऱ्या तासाला पाहिजे तसे प्रमाणपत्र मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे प्रताप मागील अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहेत.
महापालिका मुख्यालयातील वॉर्ड ‘अ’कार्यालयात तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान शंभर ते दीडशे नागरिक एका खोलीसमोर उभे असतात. ‘लोकमत’प्रतिनिधीने नागरिकांची विचारपूस केली असता जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी ही झुंबड असल्याचे सांगितले. अनेक नागरिकांनी मागील पाच ते सहा महिन्यांपासून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चकरा मारत असल्याचे नमूद केले. मनपाने ज्या चुका केल्या आहेत, त्या दुरुस्त करून देण्यासाठी मनपाच नकार देत असल्याचे काहींनी नमूद केले. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभाग सांभाळणारे लिपिक जमील हे स्वत:ला मनपा आयुक्तच समजतात. एकाही नागरिकांशी त्यांचे व्यवस्थित बोलणे नाही. प्रत्येक नागरिकाच्या अर्जात कारकुनी खोड्या काढण्यात ते अत्यंत पटाईत आहेत. वॉर्ड ‘अ’ कार्यालयांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये जन्म घेतलेल्या मुलांचे प्रमाणपत्र येथे काढण्यात येते. सर्वाधिक बालक घाटीत जन्माला येतात. त्यामुळे येथे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अलोट गर्दी असते. रुग्णालयाकडून आलेले रेकॉर्ड मनपाने आपल्या रजिस्टरमध्ये नोंद ठेवणे आवश्यक असते.
मागील अनेक वर्षांपासून वॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डच तयार केलेले नाही. रुग्णालयांकडून आलेल्या माहितीवरूनच जन्म प्रमाणपत्र बनविण्यात येते. यातील जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचे काही रेकॉर्डच गायब असल्याची धक्कादायक माहिती काही नागरिकांनी दिली. त्यामुळे मनपा कर्मचारी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जमील या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून प्रशासनाने त्यास निलंबित करावे, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली.