'रॅलीत आमच्या नेत्याला का बोलवले नाही'; वकील चाकू घेऊन थेट भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी
By सुमित डोळे | Updated: May 3, 2024 13:08 IST2024-05-03T13:07:04+5:302024-05-03T13:08:43+5:30
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'रॅलीत आमच्या नेत्याला का बोलवले नाही'; वकील चाकू घेऊन थेट भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी
छत्रपती संभाजीनगर : आमच्या नेत्याला रॅलीसाठी का बाेलावले नाही, असे म्हणत एका वकिलाने भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी चाकू घेऊन जात दगड फेकले. १ मे रोजी मध्यरात्री हनुमाननगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी धनंजय ज्ञानबा धांडे (वय २९, रा. न्यू हनुमाननगर) याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत आहे. तळपत्या उन्हातही पदाधिकारी, कार्यकर्ते नेत्याला निवडून आणण्यासाठी दारोदार फिरत आहेत. मात्र, याच दरम्यान पक्षांमधील अंतर्गत वाद, मनभेदही उफाळून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच आघाडीला समर्थन दिल्याच्या रागातून एका व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक झाली. आता रॅलीत बोलावले नाही, म्हणून पदाधिकाऱ्याच्या घरावर दगडफेक झाली. भाजप पदाधिकारी अशोक दामले १ मे रोजी घरी झोपलेले होते. १:३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घरावर दगड आल्याने त्यांना जाग आली.
तेव्हा त्यांना धांडेने कॉल करून 'तू खाली ये, नसता मी वर येऊन तुला मारतो', असे धमकावले. तो एका हातात चाकू घेऊन दुसऱ्या हाताने दगड मारत होता. 'तू आमचा नेता विशाल पुंड'ला रॅलीत का बोलावले नाही, असे म्हणत त्याने दामले यांच्या कुत्र्यालाही दगड फेकून मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दामले यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, धांडे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अंमलदार सुखदेव कावरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.